Breaking News

राज्यात पुन्हा लॉकडाऊन नाही !


राज्यात पुन्हा लॉकडाऊन नाही!
- जीम, शॉपिंग मॉल्स सुरु करण्याचे सरकारचे संकेत
- लोकलबाबत मुख्यमंत्री ठरवतील - आरोग्यमंत्री
मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जातील. महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरु करावेत का, याबाबत सध्या सरकार विचार करत आहे. मात्र लोकल ट्रेन सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देत, जीम व मॉल्स सुरु करण्याचे संकेत दिलेत.
मुंबईत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्यात आयसीयू बेड्सची कमतरता, क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांचा विनयभंग, प्लाझ्मा दान यासारख्या अनेक विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जातील. दरम्यान, महाराष्ट्रात पुन्हा जिम सुरु कराव्यात का, याबाबत सध्या सरकार विचार करत आहे. जिम हे लोकांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. तसेच राज्यातील शॉपिंग मॉल सुरु करण्याबाबतही विचार केला जाईल,’ असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये होणार्‍या घटना निंदनीय आहे. या सर्व घटनांनी माणुसकीला काळिमा फासल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीर क्वारंटाईन सेंटरबाबत लवकरच गाईडलाईन्स तयार केल्या जातील. तसेच क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे रुम किंवा वॉर्ड करण्यात येतील. तसेच यात अंतरही ठेवले जाईल. जर यासाठी काही नियम बदलावे लागले तर तेही आम्ही बदलू. तसेच या सर्व घटनांना जे जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे राजेश टोपे यावेळी म्हणाले.