Breaking News

सरपंचांवर अन्यायकारक ठरणारा निर्णय मागे घ्यावा - सौ स्नेहलताताई कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सरपंचांवर अन्यायकारक ठरणारा निर्णय मागे घ्यावा - सौ स्नेहलताताई कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
राज्य सरकारने मुदत संपणा-या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणुकीबाबत घेतलेला निर्णय विद्यमान सरपंचावर अन्यायकारक असल्याने हा निर्णय शासनाने त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचेकडे केली आहे.

राज्यातील यापुर्वी मुदत संपलेल्या व डिसेंबर अखेर मुदत संपणा-या ग्रामपंचायतीवर जिल्हयाच्या पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने संबधित ग्रामपंचायात क्षेत्रातील व्यक्तींची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय अन्यायकारक असल्याने मागे घ्यावा अशी मागणी सौ कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. गावगाडयात महत्वाची भुमिका बजावणारे सरपंच हे पद असून थेट गावपातळीवरील समस्यांची त्यांना जाणीव असते. सध्याच्या कोरोनाच्या संकटात प्रशासनाच्या बरोबरीने काम करून अशा कठीण परिस्थितीत सरपंच महत्वाची भुमिका बजावत आहे. नेहमी जनतेत वावरणारे हे पद असल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात सरपंचाना मानधन वाढवुन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि ग्रामविकासाचे स्वप्न साकारण्यासाठी ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याचे काम केले आहे. शिर्डी येथे सरपंच परिषदेचे आयोजन करून सरपंचांच्या अडीअडचणी, समस्यां समजावून घेऊन त्याचे निराकरण करण्याचे काम केले होते. त्यामुळे निश्चितच ग्रामविकासाला चालना मिळून सरपंचावर मोठा विश्वास टाकून त्यांना सन्मानित करण्याचे काम केले.
परंतू आताच्या आघाडी सरकारने सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांना नियुक्तीपासून वंचित ठेवण्याचा अध्यादेश काढला लोकशाही मार्गाने निवडुन आलेल्या लोकप्रतिनिधीची नेमणुक न करता इतर व्यक्तीची नेमणुक करणे हे लोकशाहीला निश्चितच मारक आहे. राज्यसरकार चोर वाटेने प्रशासक नेमून सरपंचांवर मोठा अन्याय करत आहे. त्यामुळे यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. तसेच सरपंचांना न्याय मिळून देण्यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे यावेळी सौ कोल्हे म्हणाल्या