Breaking News

कर्मचार्‍यांच्या पगारासाठी सरकारची पुन्हा रडारड!

कर्ज काढून पगार करावे लागतील - मंत्री वडेट्टीवार

- चार महत्वाचे विभाग वगळता इतर विभागांमध्ये पगारकपात शक्य

पुणे/ विशेष प्रतिनिधी 
महसूलात घट झाल्याने राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांचा पगार देणेही सध्या शासनाला अवघड बनले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात त्यांचा पगार देणेही कठीण होईल, त्यासाठी कर्ज काढण्याची वेळ देखील येऊ शकते, अशी चिंता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले, की पुढच्या महिन्यात पगार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला कर्ज काढण्याची वेळ पडेल अशी परिस्थिती आहे. मात्र जे कोरोनासाठी काम करत आहेत, त्यांचा पगार व्यवस्थित होईल. परंतु इतरांबाबत थोडसे मागे पुढे होऊ शकते. चार महत्वाचे विभाग वगळता इतर विभागांमध्ये काटछाट करण्याची वेळ येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. करोनामुळे शासनाच्या महसूलात घट झाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी पुढील महिन्यात कर्ज काढावे लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मदत व पुनवर्सन, आरोग्य आणि इतर दोन विभाग वगळता इतर विभागात वेतन कपात करण्याची वेळ आली आहे. मात्र, डॉक्टर, नर्स आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या करोना योद्ध्यांचे पगार दिले जाणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकारकडून कोणतीही मदत झालेली नाही. पीएम केअर फंडाला मदत करा असे सांगणारे महाराष्ट्र द्रोही आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे अजुनही सत्ता गेल्याच्या शॉकमधून बाहेर येऊ शकलेले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.