Breaking News

संगमनेर तालुक्यात एकाच दिवशी तेरा कोरोना बाधित, कुरण गाव बनतंय 'कोरोना हॉट स्पॉट'

    कुरण गावचे मुंबई कनेक्शन; ग्रामसेवकाला मारहाण 
-------------
मुंबईहून आलेल्या आपल्या पाहुण्यांना ग्रामसेवक गंगाधर राऊत यांनी जिल्हा परिषद शाळेत विलगीकरणात ठेवल्याच्या रागातून येथील स्थानिकांनी ग्रामसेवक राऊत यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार काल शुक्रवार दि.३ रोजी रात्री उशिरा घडला. यावेळी घटना स्थळावर पोहोचलेल्या पोलिसांशी देखील आरोपींनी हुज्जत घालायला सुरुवात केली. याप्रकरणी शहर ठाण्यात आरोपी जाकीर समशेर शेख याच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर/प्रतिनिधी :
       संगमनेर तालुक्यात आज शनिवार दि.४ रोजी एकाच दिवशी १३ कोरोना बाधितांची भर पडली आहे. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड लॅब मध्ये आज एकूण २६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले असून यातील निम्मे म्हणजेच १३ रुग्ण एकट्या संगमनेर तालुक्यातील आहेत.
     याबाबत जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि तालुक्यात आढळून आलेल्या तेरा रुग्णांपैकी संगमनेर शहरापासून अगदी जवळ असलेल्या कुरण गावात आठ रुग्ण कोरोना बाधित आले असून यापूर्वी येथील ८ रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे कुरण गावातील बाधितांची संख्या १६ इतकी झाली आहे. कुरण येथील परिस्थिती आटोक्यात येत नसल्यामुळे संपूर्ण गाव 'कोरोना हॉटस्पॉट' बनले आहे. याशिवाय तालुक्यातील संगमनेर खुर्द आणि घुलेवाडी येथील प्रत्येकी एक असे दोन रुग्ण बाधित आले आहेत. त्याचबरोबर संगमनेर शहरातील रेहमतनगर, श्रमिकनगर आणि विठ्ठलनगर येथील प्रत्येकी एक असे तीन रुग्ण आढळून आले आहे. 
       आज मिळून आलेल्या तेरा रुग्ण पकडता संगमनेर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या १२६ इतकी झाली आहे. तालुक्यात बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ९३ इतकी असून आजचे १३ रुग्ण पकडता एकूण २२ रुग्णांवर कोरोनाचा उपचार सुरु आहे.