Breaking News

कोपरगाव बाजार समिती नेमकी कुणाची?

गणेश दाणे/कोपरगाव प्रतिनिधी -
कोपरगाव तालुका गोदावरी कालवे आणि गोदातीरामुळे बऱ्यापैकी समृद्ध आहे.त्यात कारखानदारीची देखील चांगलीच भर पडलेली असल्यामुळे  येथील विधानसभा आणि बहुतांशी ग्रामपंचायती वगळता बाकी निवडणुका आपसात होत आहे.त्यातीलच एक म्हणजे कोपरगाव बाजार समिती तिथे सर्व तालुक्यातील कर्त्याधर्त्या मंडळींच्या मांडीला मांडी लावुन बसणारे संचालक आहेत.मग अशा ठिकाणी शेतकऱ्यांबद्दल रक्तपिपासु वृत्तीला कसा वाव मिळतो हे प्रत्येकाला पडलेले कोडे असले तरी सध्या व्यापारी मालामाल मात्र शेतकरी कंगाल अशी परिस्थिती असुन,एरव्ही शेतकऱ्यांची संस्था म्हणून गवगवा होत असताना सध्या नेमकी हि संस्था शेतकऱ्यांची म्हणावी की,व्यापारी आणि संचालक मंडळांची हा संशोधनाचा मुद्दा ठरत आहे.

       शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या हेतूने आणि शेतकऱ्यांची  फसवणूक होणार नाही या उद्देशाने स्थापन झालेली बाजार समितीच  शेतकऱ्यांचा गळा घोटत आहे.मोठ्या कष्टाने अनंत संकटांचा सामना करत  धान्य  पिकवले जाते ,घरात धान्याची रास पडेपर्यंत जिव मुठीत धरुन रहावं लागतं.यंदा तालुक्यात खराब बियाणांमुळे शेकडो हेक्टर पेरणी वाया गेली.दुबार पेरणीचे संकट ओढावले त्यात करोना महामारीमुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनचा फटका उत्पानाला बसला त्याच सोयर सुतक कुणालाच नाही.

          उलट भुसार मालाची भाववाढ आज ना उद्या होईल या आशेवर जगत बाजार समितीत धान घेऊन गेल्यावर मालाला कमी भाव मिळाला तरी त्यात समाधान मानुनही प्रति क्विंटलला एक किलोची व्यापारी वर्ग कपात करुन दैनंदिन दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांचे खिसे कापण्याचा उद्योग करतात.कोपरगाव बाजार समितीत दैनंदिन सरासरी हजार क्विंटल भुसार मालाची आवक आहे.तेच खळे झाल्यानंतर आवक जास्त असते.भुसार माल सध्या मका वगळता बहुतांशी मुग,हरबरा,सोयाबीन,उडीद,गहु,ज्वारी,बाजरी याचा दर साधारण एकोणीसशे ते साडेचार हजारापर्यंत भावाने प्रति क्विंटल माल बाजार समितीत खरेदी केलेला आहे.सर्व मालाच्या सरासरीत किलोचे तिस रुपये पकडले.तरी दैनंदिन हजारो रुपये व्यापारी नियमबाह्य घट देऊन कमाई करत आहे.

          इलेक्ट्रॉनिक काट्यात घट येत असल्याचा आव आणुन बाजार समितीच्या आवारातील काट्याला झटका देऊन शेतकऱ्यांना झटका दिला जातो.जर नसेल दिला जात तर व्यापाऱ्याने आवारात मोजलेला माल इलेक्ट्रॉनिक काट्यावर मोजून शहानिशा करण्यास काय हरकत आहे.नेमके पाणी कुठे मुरते याचा शेतकऱ्यांच्या हितासाठी शोध घेतला पाहिजे शेजारील बाजार समित्यांची तशी सक्ती नाही.याबाबत बाजार समितीचे सभापती ,प्रशासकीय कर्मचारी मुग गिळुन गप्प का बसतात याचाही छडा लावणे गरजेचे आहे.

        खरेदी केलेल्या मालाचे व्यापारी पुढील तारखेचे चेक देतात.तिच रक्कम नेट बँकींगच्या सुविधेमुळे त्वरीत अॉनलाईन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करता येऊ शकते.शेतकऱ्याने मागणी करुनही तशे होत नाही.

विशेष म्हणजे बाजार समिती अधिनियम १९६३नियम १९६७ कलम ३९ चा कायदा वर्षानुवर्षे बाजार समितीकडून पायदळी तुडविला जात असुन अशा गैरप्रकाराला पणन संचालनालयाने किंवा ज्यांचे नियंत्रण आहे.अशा  तालुका निबंधकांनी कानाडोळा न करता कारवाई करण्याची सर्वसामान्य शेतकऱ्यांची धारणा आहे.