Breaking News

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

- मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर वाढला, अनेक भाग जलमय

मुंबई/ प्रतिनिधी 
मागील 24 तासांमध्ये राज्यात सर्वत्र पाऊस सुरु कोसळत होता. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत जोरदार पाऊस झाला. मुंबईतील काही ठिकाणी पावसाने पाणी साचल्याची स्थितीही तयार झाली.
मुंबईतील पूर्व उपनगरात जोरदार पाऊस पडला. मुलूंड ते सायन या परिसरातही मुसळधार पाऊस झाला. चेंबूरमधील पोस्टल कॉलनीत 3 फूट पाणी साचले. या पावसाने अगदी गटाराचे पाणी वर येऊन नागरिकांच्या घरात शिरले. ठाण्यात कमी जास्त प्रमाणात पावसाचा जोर सुरु होता. पावसाचा जोर असाच सुरु राहिल्यास सखोल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तविण्यात आली. अंबरनाथ तालुक्यातही सकाळपासून पावसाने हजेरी लावली. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागातही सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. नांदेडमध्ये सततच्या पावसाने सहस्त्रकुंड येथील धबधब्याचा प्रवाह वाढला असून, नांदेडसह शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यात दमदार पाऊस बरसला. पैनगंगा नदीवर इस्लापूर जवळच्या धबधब्याचा प्रवाह देखील वाढला. समाधानकारक पावसाने किनवट, माहूर तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुणे, नगर, नाशिक व बीड जिल्ह्यातही चांगल्या पावसाने हजेरी लावली.