Breaking News

पारनेर मध्ये रोजचा भाजीबाजार आजपासून आठवडे बाजाराच्या ठिकाणी,बाजारतळावर भरणार.

रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांना बाजारतळावर सर्व नियमांचे पालन करून बसु द्यावे तहसीलदार देवरे यांच्या सूचना 

पारनेर/प्रतिनिधी :
शहरातील दररोज सकाळी भरणारा भाजीबाजार आता उद्या,मंगळवारपासून आठवडे बाजाराच्या ठिकाणी,बाजारतळावर भरणार आहे.करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत बाजारतळावर भाजीबाजार भरवावा अशी सूचना तहसीलदार ज्योती देवरे यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ.सुनीता कुमावत यांना दिलेल्या आहेत.
            करोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावरच भाजीपाला व फळे विक्री करण्यात येत होती.मात्र अरुंद रस्ते, नागरिकांची बेपर्वाई यामुळे भाजी बाजारात सामाजिक अंतराचे पालन होत नव्हते.तसेच भाजी विक्रेते रस्त्यावर पथारी पसरून बसत असल्याने धूळ, सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.नागरीकांनी अनेक वेळा मुख्याधिकारी कुमावत यांच्याकडे बाजारतळावर भाजीबाजार भरवण्याची मागणी केली होती.मात्र कर्मचारी कमी असल्याचे कारण देत कुमावत यांनी नागरीकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
        या पार्श्वभूमीवर पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, संघाचे सचिव उदय शेरकर,पत्रकार शशी भालेकर,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे,अर्जून भालेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य शंकर नगरे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांची भेट घेऊन बाजारतळावरील प्रशस्त जागेत भाजीबाजार भरवण्याची मागणी केली.तहसीलदार देवरे यांनी या मागणीला प्रतीसाद देत लगेचच बाजारतळ परिसराला भेट देऊन पाहणी केली.यावेळी मुख्याधिकारी डॉ.सुनीता कुमावत उपस्थित होत्या.
           नगरपंचायतीने दररोज बाजारतळाची साफ सफाई करून निर्जंतुकीकरण करावे,भाजी विक्रेते सहा फूट अंतर सोडून बसतील याची काळजी घ्यावी त्यासाठी सहा फुटांच्या अंतरावर खुणा कराव्यात, विक्रेत्यांना हातमोजे वापरणे बंधनकारक करावे,बाजारतळाच्या प्रवेशद्वारावर नागरीकांच्या प्राथमिक आरोग्य तपासणीची व्यवस्था करावी त्यासाठी आरोग्य विभागाचे सहकार्य घ्यावे आदी सूचना तहसीलदार देवरे यांनी मुख्याधिकारी कुमावत यांना दिल्या.
   तहसीलदार देवरे यांच्या आदेशानुसार नगरपंचायतीने बाजारतळावर भाजीबाजार भरवण्याची तयारी केली असून उद्यापासून त्याठिकाणी भाजीपाला व फळांची विक्री सुरु होणार आहे.


 मुख्याधिकारी डॉ. कुमावत यांच्या आडमुठेपणामुळे भाजी विक्रेते आणि नागरिकांना गेलेल्या तीन महिन्यांपासून त्रास सहन करावा लागला.रस्त्यावरील धूळ व सांडपाण्यामुळे आरोग्याचे प्रश्नही निर्माण झाले होते.आता बाजारतळावरील प्रशस्त जागेत,ओट्यावर एकाच ठिकाणी भाजीबाजार भरणार असल्याने नागरीकांची सोय होणार आहे.

 भाजी व फळविक्रेत्यांनी बाजारतळावरच विक्री करावी, रस्त्यावर बसू नये.बसस्थानक चौकातील फळविक्रेत्यांनी बाजारतळावरच फळांची विक्री करावी अन्यथा कारवाई केली जाईल.फळविक्रेत्यांची अतिक्रमणे कोणतीही पूर्वसूचना न देता हटवण्यात येतील असा इशारा तहसीलदार देवरे यांनी दिला आहे.