Breaking News

दुग्ध विकास मंञ्यांबरोबर झालेल्या ऑनलाईन बैठकीत सकारात्मक चर्चा परंतु शेतकऱ्यांच्या पदरी निराशा !

दुग्ध विकास मंञ्यांबरोबर झालेल्या ऑनलाईन बैठकीत सकारात्मक चर्चा परंतु ठोस निर्णय नाही.

 आंदोलनाची दिशा लवकरच सर्व संघटनांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून ठरवणार - अनिल देठे पाटील 


अहमदनगर / प्रतिनिधी :
      महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास मंत्री ना. सुनिल केदार , राज्यमंत्री ना. दत्तामामा भरणे , दुग्ध विकास विभागाचे सचिव तसेच राज्यातील शेतकरी संघटनांचे नेते व दुध संघांचे चेअरमन , व्यवस्थापक यांच्यात दुध दरवाढीच्या संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक पार पडली. राज्याच्या दुग्ध विकास मंञ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचे व दुध संघांच्या प्रतिनिधींचे सविस्तर म्हणणं ऐकुन घेत लवकरच राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर यासंदर्भात चर्चा करून दुध उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल अशी योजना आणण्याचे त्यांनी आश्र्वासन देत बैठक आटोपती घेतली. साधारण दोन तास झालेल्या बैठकी दरम्यान माजी खासदार राजु शेट्टी यांनी सरकारकडे प्रतिलीटर पाच रू.अनुदान देण्याची मागणी केली  तसेच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी प्रतीलिटर दहा रुपये अनुदान देण्याची आग्रही मागणी केली. त्यांच्या मागणीचे डॉ.अजित नवले , रोहिदास धुमाळ , मधुकर म्हसे , धनंजय धोरडे यांनी समर्थन करत लवकरात लवकर याबाबत सरकारने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. सरकारने निर्णय घेण्यास विलंब केला अथवा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास सर्व समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल असे शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी सांगितले.