Breaking News

मोदींचे पुन्हा धक्कातंत्र; अचानक लेहला पोहोचले!

- भारत-चीन तणावाच्या पार्श्‍वभूमीवर लष्कप्रमुखांसह भेट
- जवानांचे मनोध्यैर्य वाढविले, जखमी जवानांची घेतली भेट

श्रीनगर / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत अचानक लेह-लडाखचा दौरा केला. पंतप्रधान मोदींनी लष्कर, वायुसेना आणि इंडो तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) जवानांशी संवाद साधला व त्यांचे मनोध्यैर्य वाढविले. तसेच, जखमी जवानांचीही भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी जवानांना चकित करण्यासाठी याआधीही अशा अकस्मात भेटी दिल्या आहेत. दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा ते अद्याप पाळत आहेत.
चीनसोबत झालेल्या संघर्षानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहमध्ये दाखल झालेहोते. गलवान येथे जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन त्यांनी भेट घेतली. त्यांच्यासोबत तीनही दलांचे प्रमुख बिपीन रावत हेदेखील हजर होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असताना थेट पंतप्रधान तिथे पोहोचल्याने भारताची आक्रमक भूमिका दिसून येत आहे. यापूर्वी सैन्यदलाचे प्रमुख बिपिन रावत येथे दौर्‍यावर येणार असल्याचे वृत्त होते. तेथे ते एलएसीवरील सुरक्षेचा आढावा घेणार होते. मात्र, मोदी यांनी अचानक भेट दिली. मोदी यांच्या सोबत सैन्यदल प्रमुख बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे हेदेखील उपस्थित होते. मे महिन्यापासून भारत-चीनदरम्यान तणाव निर्माण झाला आहे. या काळात अचानक लेहला भेट देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देत, सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला आहे.