Breaking News

जेष्ठ विधिज्ञ, राज्यघटना तज्ज्ञ व आव्हाड क्लासेसचे संस्थापक अॅड. भास्करराव आव्हाड यांचे निधन !
जेष्ठ विधिज्ञ, राज्यघटना तज्ज्ञ व आव्हाड क्लासेसचे संस्थापक अॅड. भास्करराव आव्हाड यांचे निधन !
पाथर्डी/प्रतिनिधी :
  ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड भास्करराव आव्हाड यांचे आज (दि.24) सकाळी निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या मागे मुलगा अ‍ॅड. अविनाश आव्हाड, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येते

भास्करराव आव्हाड यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी (शिराळ) या गावातील शेतकरी कुटुंबात झाला होता.

पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बी. कॉम पदवी प्राप्त केली. त्यानंतर विधि महाविद्यालयातून एलएल.बी व पुणे विद्यापीठातून एलएल.एम या पदव्या विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.

त्यानंतर पुण्यातच कायद्याचे प्राध्यापक म्हणून ते कार्य सुरु केले. वकिली व्यवसायही सुरु केला. त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही प्रकरणे चालवली.

आव्हाड यांनी वैदिक न्याय शास्त्र हा ग्रंथ लिहिला. तसेच कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी व वकिलांसाठी अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे मरुद्यान व उद्यानविश्व हे दोन कविता संग्रह प्रसिद्ध झाले. त्यांनी युरोप दौऱ्यावरचे क्षितीजापार, अमेरिकेच्या दौऱ्यावरचे कोलंबसाचा मागोवा आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरचे शोध कांगारुंचा ही तीन प्रवासवर्णनेही लिहिली आहेत.
       पुण्यात विधी महाविद्यालयात गावाकडून शिकण्यास येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांचे ते आधारवड, मार्गदर्शक व आधारस्तंभ होते. ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’चे माजी अध्यक्ष, सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ
अ‍ॅड. आव्हाड यांच्या जाण्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे.