Breaking News

दूधाचे अनुदानासाठी भारतीय जनता पार्टीचे तहसिलदारांना निवेदन.

दूधाचे अनुदानासाठी भारतीय जनता पार्टीचे तहसिलदारांना निवेदन.
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
 दूध उत्पादक शेतक-यांना प्रतिलिटर १० रूपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रूपये अनुदान दयावे, तसेच गायीच्या दूधाला किमान ३० रूपये दर दयावा या मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. 
कोपरगावचे तहसिलदार श्री योगेश चंद्रे यांना दूध उत्पादकांनी दूध भेट देऊन मागणीचे निवेदन दिले, यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष कैलास खौरे, रामदास शिंदे, विष्णुपंत बोळीज, सुधाकर गाढवे उपस्थित होते. महाराष्ट्रातील शेतक-यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारला जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतक-यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतक-यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाबरोबरच दूधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादक शेतक-यांची अवस्था दयनीय झाली आहे.
महाराष्ट्रात १ कोटी ४० लाख लिटर गायीचे दूध उत्पादीत होते. त्यापौकी ३५ लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केले जाते. ९० लाख लिटर दूध खाजगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातुन विकत घतले जाते. १५ लाख लिटर दूध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. शासकीय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दूध खरेदी केले जाते. या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दूधाचा विक्रीमध्ये 30 टक्केपर्यत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दूधाची मागणी घटली, आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दूध संघाकडून दूध १५ ते १६ रूपये दराने खरेदी केले जात आहे. यामुळे दूधाचा उत्पादन खर्च सुध्दा निघु शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दूध २५ रूपये प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती परंतू प्रत्यक्षात मात्र ७ लाख लिटर दूध खरेदी केले जात आहे. मंत्र्याचे लागेबांधे असलेल्या दूध संघाकडून शासन दूध विकत घेत आहे. इतर शेतकज्यांना व दूध उत्पादकांना शासनाने वाज्यावर सोडले आहे.
    गायीच्या दूधाला प्रती लिटर १० रूपये अनुदान, दूध भुकटी करिता प्रती किलो ५० रूपये अनुदान, शासनाकडून ३० रूपये प्रती लिटरने दूधाची खरेदी या न्याय्य मागणीकरिता आम्ही सर्व शेतकरी १ ऑगष्ट रोजी राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.