Breaking News

सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला दुग्धाभिषेक, एक हजार लिटर दूध मोफत वाटले !

सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला दुग्धाभिषेक, एक हजार लिटर दूध मोफत वाटले !
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी  
             दुधाला दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे  केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला दुग्धाभिषेक करून, तहसिल कार्यालयाच्या गेटवर उभे राहुन  रस्त्यावर दूध ओतण्या ऐवजी नागरिकांना एक हजार लिटर दूध मोफत वाटण्यात आले.
                   पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य झाल्या नाहीत. तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
                    राहुरी तहसील कार्यालयासमोर एक हजार लिटर दूधाचे कॅनसह स्वाभिमानीचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, संतोष पवार, अरुण डौले, प्रमोद पवार, आनंद वने, सचिन गडगुळे, सुनील इंगळे, असिफ पटेल, संदीप शिंदे, रवींद्र साळुंके, निलेश शिंदे व इतर शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी मोरे म्हणाले, कोरोना लॉकडाऊनमुळे दूध उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत दूध विकावे लागत आहे. केंद्र व राज्य सरकारला जाग आणण्यासाठी आज एक दिवसाचे लाक्षणिक दूध बंद आंदोलन केले. रस्त्यावर दूध ओतण्याऐवजी गरीब नागरिकांना मोफत दूध वाटप केले. केंद्र सरकारने 23 जूनला दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा. ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा.
                         दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रति किलो ३० रुपये अनुदान द्यावे, दूध पावडर, तूप, बटर व इतर दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी रद्द करावी. राज्य सरकारने पुढील तीन महिने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा करावे. अशा स्वाभिमानीच्या मागण्या आहेत. मागण्या मान्य झाल्या नाहीत. तर, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही मोरे यांनी सांगितले.