Breaking News

दुग्ध व्यवसायात अस्थिरता वाढल्याने शासनाने पाच रुपये अनुदान द्यावे - परजणे

दुग्ध व्यवसायात अस्थिरता वाढल्याने शासनाने पाच रुपये अनुदान द्यावे - परजणे
कोपरगांव / तालुका प्रतिनिधी 
        दुग्धव्यवसाय हा अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार, अल्पबचत गट
यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असून अनेकांना त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झालेला असताना सद्याच्या कोरोना महामारीच्या संकटामुळे रोजगाराची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. अनेकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुधाचे दर अस्थिर होवून शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनमानावर विपरित परिणाम होत आहे. या गंभिर समस्येचा विचार करुन शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादीत सर्व दुधावर प्रतिलिटर ५ रुपये प्रमाणे अनुदान उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध
संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली.
        मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, दुग्धविकास मंत्री ना. सुनील केदार यांना पाठविलेल्या निवेदनातून श्री परजणे यांनी सद्याच्या दुग्ध व्यवसायातील अडचणी निदर्शनास आणून दिल्या. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ ( महानंद ) राज्यातील सहकारी दूध संघांकडून रुपांतरासाठी दूध घेत असले तरी एकूण संकलनाच्या अतिशय नाममात्र प्रमाणात ते खरेदी केले जात आहे. ते देखील २७ जुलै २०२० पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सद्यःस्थितीत शासनाने दूध उत्पादकांना खरेदी केलेल्या दराप्रमाणे सर्व दुधावर दर द्यावा लागत आहे. त्यामुळे संघांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती कोरोना महामारीच्या संकटामुळे अतिशय अडचणीची व बिकट झालेली आहे. त्यांनी उत्पादीत केलेल्या दुधाचा खर्च भागविता येत नाही. कारण दुग्धव्यवसायाच्या अनुषंगिक वस्तुंचे ( उदा -  पशुखाद्य, चारा, पाणी, मिनरल मिक्चर आदींचे ) दर गगनला भिडलेले आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेले पशुधन जगविणे शेतकऱ्यांना अवघड झालेले आहे. अशा परिस्थितीत शासनाने सहकार्य न केल्यास पशुधन विकण्याची वेळ येते की काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. एकदा पशुधन विकले गेल्यानंतर चार - पाच वर्षे तरी पुन्हा दुधाळ पशुधन निर्माण करण्यास कालावधी जाणार आहे. या सर्व अडचणीमुळे राज्याला दुधाची कमतरता भासू नये यासाठी दूध उत्पादकांना सर्व उत्पादीत दुधावर अनुदान मिळणे गरजेचे आहे.
        कोपरगांव तालुक्यातील गोदावरी खोरे सहकारी दूध संघ हा ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी गेल्या ४५ वर्षापासून कार्यरत आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे दुग्धव्यवसायावर दिवसेंदिवस विपरित परिणाम होत आहे. बाजारपेठेतील पॅकींग दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री दिवसेंदिवस कमी होत चाललेली असून बाजारपेठेतील पावडरचे दर देखील कमी होत आहेत. परिणामी या भागातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार, अल्पबचत गट यांच्यासमोर रोजगाराची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. तसेच दुधाचे दर अस्थिर होवून शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनमानावर विपरित परिणाम होत आहे. या गंभिर समस्येचा विचार करुन शासनाने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादीत सर्व दुधावर प्रतिलिटर ५ रुपये प्रमाणे अनुदान उपलब्ध करुन द्यावे अशीही मागणी श्री
परजणे पाटील यांनी केली. निवेदनाच्या प्रती दुग्ध खात्याचे सचिव व आयुक्त यांनाही पाठविण्यात
आलेल्या आहेत