Breaking News

गूड न्यूज : कोरोनावरील लसीचे सकारात्मक रिझल्ट!

पुण्यात होणार लसीचे उत्पादन!


- अवघ्या हजार रुपयात लस देण्याचा सिरमचा प्रयत्न
- मानवावर लस यशस्वी, साईड इफेक्टही काही नाहीत!
लंडन/वृत्तसंस्था
कोरोना विषाणूवरील लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे आणि आता ऑक्सफर्डच्या लशीबाबत गूड न्यूज मिळाली आहे. या लशीच्या पहिल्या क्लिनिकल ट्रायलचा रिझल्ट समोर आला असून, या लशीचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लवकरच ही लस बाजारात येणार असून, पुण्यातील सिरम  इन्स्टिट्यूट मध्ये या लसीचे उत्पादन होणार असल्याची माहिती हाती आली आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने कोरोनावर शोधलेल्या Ch-dOx1 nCoV-19 लशीची मानवी चाचणी झाली होती. त्याचे परिणाम मंगळवारी जाहीर करण्यात आले. ते परिणाम सकारात्मक असून शास्त्रज्ञांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जगप्रसिद्ध लॅन्सेट मासिकात याबाबतचा एक अहवाल जाहीर झाला आहे. त्यात ते निष्कर्ष देण्यात आले आहेत. या औषधाचे कुठलेही घातक परिणाम आढळून आलेले नाहीत. त्याचबरोबर प्रतिकार शक्तीही वाढल्याचे दिसून आल्याची माहिती देण्यात आली आहे. अँटिबॉडीज आणि पांढर्‍या पेशींची वाढ झाल्याचेही आढळून आले आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होते. हे परिमाण सकारात्मक असले तरी आणखी काही चाचण्यांची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अ‍ॅस्ट्रा झिनेका या कंपनीच्या मदतीने ऑक्सफर्डने  ही लस तयार केली आहे. भारतातील पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटनेही ऑक्सफर्डच्या लशीसंदर्भात करार केला आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधे निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ती  ओळखली जाते. सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पुनावाला यांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सफर्डची या लशीची प्राण्यांवर चाचणी यशस्वी झाली आणि आता मानवी चाचणीतदेखील ही लस प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आम्ही या लशीचे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही लस फक्त एक हजार रुपयात उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी मॉडर्ना या अमेरिकन कंपनीच्या लशीने पहिली चाचणी यशस्वी पार केली. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, 45 निरोगी लोकांवर या लसीची पहिली चाचणी घेण्यात खूप चांगले परिणाम दिसून आले. मोडर्नाच्या लसविषयी आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे याचे कोणत्याही रुग्णांवर साइट इफेक्ट दिसून आले नाहीत.

भारतीय लशीची मानवी चाचणी सुरू! : भारतीय औषधी कंपनी जायदस कॅडिला यांनी सांगितले की, त्यांनी संभाव्य कोरोना लशीची मानवी चाचणी सुरू केली आहे. ZYCoV-D ही लस प्लाझ्मिड डीएनए लस, प्री-क्लिनिकल टॉक्सिसिटी अभ्यासामध्ये सुरक्षित मानली गेली आहे. यापूर्वी, या कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये प्रतिकारशक्ती आणि प्रतिकारशक्ती चाचण्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.