Breaking News

दूध उत्पादकांचा १ ऑगस्टपासून राज्यव्यापी एल्गार, शेतकरी संघर्ष समितीची घोषणा !

दूध उत्पादकांचा १ ऑगस्टपासून राज्यव्यापी एल्गार, शेतकरी संघर्ष समितीची घोषणा !
पुणे / प्रतिनिधी
दूध उत्पादक १ ऑगस्टपासून राज्यव्यापी एल्गार करणार, अशी घोषणा किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. चावडीवर दुधाचा अभिषेक घालत राज्यभर आंदोलन तीव्र करणार असून, प्रतिलीटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करा, अशी मागणी किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.
दूध उत्पादकांचे आंदोलन तीव्र करण्याची हाक किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिली आहे. दुधाला प्रतिलीटर किमान ३० रुपये भाव मिळावा, यासाठी राज्य सरकारच्यावतीने प्रतिलीटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करा, अशी मागणी या शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने २६ जून रोजी नोटिफिकेशन काढून बाहेरच्या देशातून १० लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करा. हा निर्णय शेतकर्‍यांचा घात करणारा आहे, असेही या समितीने म्हटले. जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध आणि दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करा आणि देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रतिकिलो किमान ५० रुपये अनुदान द्या, असेही या समितीने म्हटले. किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि समविचारी संघटनांच्यावतीने २० जुलैपासून राज्यात आंदोलन सुरू आहे. १ ऑगस्टरोजी राज्यभर गावोगावी चावडीवर दुधाचा अभिषेक घालत निदर्शने करत हे आंदोलन तीव्र केले जाणार आहे.