Breaking News

सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी आणलेल्या निधीतील कामे पहातांना विद्यमान आमदारांची झाली दमछाक - विवेक कोल्हे

सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी आणलेल्या निधीतील कामे पहातांना विद्यमान आमदारांची झाली दमछाक - विवेक कोल्हे
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी मतदार संघामध्ये विकासकामांचा डोंगर उभा केला, मोठया प्रमाणात निधी आणून विविध विकासकामे करून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले, त्यांच्या कार्यकाळातील अनेक कामे प्रगतीपथावर असून त्या कामांची पहाणी करण्यासाठी भेटी देत असतांना विद्यमान लोकप्रतिनीधींची दमछाक होत आहे,अशी टीका कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
नव्याने स्थापन झालेल्या सरकार अस्तित्वात आल्यापासून विद्यमान लोकप्रतिनिधींना मतदार संघासाठी काहीच करता येत नसल्याने त्यांनी माजी आमदार सौ कोल्हे यांच्या कार्यकाळात मंजुर झालेल्या जुन्याच कामांना भेटी देत पहाणी करण्याचा नवीन कार्यक्रम सुरू केला असून आम्हींच विकासकामे करीत असल्याचे जनतेला भासविण्याचा खटाटोप करत आहे. तालुक्यातील रांजणगाव देशमुख व इतर सहा गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा काही वर्षापासून कायमस्वरूपी बंद केलेला विद्युत पुरवठा माजी आमदार सौ कोल्हे यांनी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. व त्यातच एक्सप्रेस फिडरवरून जोडणीही करून या योजनेच्या साठवण तलावात पाणी सोडण्याचे काम केले. योजना कार्यान्वित करून परिसरातील जनतेला पाणी पुरवठा केला असंतांना विद्यमान लोकप्रतिनिधी मात्र केवळ फोटोसेशन करून या योजनेचे काम आपणच केल्याचे दाखवून जनतेची दिशाभूल करत आहे.
    मुख्यमंत्री ग्रामसडक,अर्थसंकल्प,नाबार्ड अशा विविध योजनेअंतर्गत मतदार संघामध्ये अनेक रस्त्यांची कामे करण्यात आली तर काही कामे ही प्रगतीपथावर आहे. कधी नव्हे एवढा मोठा निधी मतदार संघातील रस्त्यांच्या कामासाठी आणला, कामे पुर्ण झाली असून रवंदा-ब्राम्हणगांव रस्ता तसेच जुना टाकळी रस्त्याचे काम अंतिम टप्यात आहे. या रस्त्यांवर जाऊन विद्यमान लोकप्रतिनिधी अधिका-यांना सूचना देण्यातच धन्यता मानत आहे.
कोकमठाण, जेऊरकुंभारी परिसरातील जनतेला नेहमी भेडसावणारा वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून या भागासाठी नवीन सबस्टेशन सौ कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे  मंजूर झाले. या सबस्टेशनमुळे या भागाचा वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे,ही वस्तुस्थिती असतांना तेथेही जाऊन पहाणी करण्याचे नाटक केले. तर पुरपरिस्थितीदरम्यान  शहराला जोडणारा महत्वाचा रस्ता गोकुळनगरी पुलासाठी सौ कोल्हे यांनी 37 लाखाचा निधी मंजुर करून आणला, या पुलाचे काम लवकरच पुर्ण होत आहे. गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात मंजूर आणि प्रगतीपथावर असलेल्या कामांची पहाणी करण्याचे एकमेव काम विद्यमान लोकप्रतिनिधीकडून सध्या मतदार संघात सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या लोकप्रतिनधींची ही क़ृती म्हणजे माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी विकासकामे केल्याचीच जनतेला कबुली देत असल्याचे श्री विवेक कोल्हे म्हणाले.