Breaking News

कोरोनाशी झुंज अपयशी, ज्येष्ठ विधिज्ज्ञ भास्करराव आव्हाड कालवश !

कोरोनाशी झुंज अपयशी, ज्येष्ठ विधिज्ज्ञ भास्करराव आव्हाड कालवश
पाथर्डी/पुणे/ विशेष प्रतिनिधी
ज्येष्ठ विधिज्ज्ञ व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तीन ते चार दिवसांपासून ते उपचार घेत होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात मुलगा अ‍ॅड. अविनाश आव्हाड, मुली, पत्नी, असा परिवार आहे. आव्हाड यांच्या जाण्याने पाथर्डी, नगर जिल्ह्यासह पुणे शहरातील विविध स्तरांतून तीव्र हळहळ व्यक्त करण्यात आली. वंजारी समाजाला आरक्षण मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निधनाने हा समाज पोरका झाला आहे.
पुण्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे ज्येष्ठ विधिज्ज्ञ भास्करराव आव्हाड यांना शहरातील दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात ते कृत्रिम श्वसन यंत्रणेवर होते. परंतु, त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिंचोडी हे भास्कर आव्हाडांचे मूळगाव होते. आव्हाड हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे स्नेही होते. पुण्यातील एमआयटी शिक्षण संस्था उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. केवळ वकिलीच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्रात वावर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून भास्करराव आव्हाड यांची ओळख होती. तसेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. लॉकडाऊनच्या काळातदेखील कायद्याचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करण्याचे काम केले. विविध वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक यातून लेखन करून समाजात कायद्याविषयी जनजागृती व्हावे यासाठी त्यांनी लिहिलेले लेख चिंतनीय आहेत. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका खेड्यात जन्म झालेल्या आव्हाड यांना महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थानी पुरस्काराने गौरवले होते. राज्यातील शेकडो न्यायाधीश तयार करण्यात तसेच वकिलांना मार्गदर्शन करण्यात त्यांचे म्ाोलाचे योगदान होते. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांचे अनेक खटले महत्वपूर्ण ठरले होते. वयाच्या ७७ व्या वर्षीही भास्कर आव्हाड हे राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी बोलावल्यावर वकील संघटनेला मार्गदर्शन करत होते. त्यांच्या पश्चात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे सदस्य असलेले चिरंजीव अ‍ॅड. अविनाश आव्हाड, पत्नी व दोन मुली, बंधू अ‍ॅड. डॉ. सुधाकर आव्हाड आणि पुतणे असा परिवार आहे. पुणे येथेच त्यांच्यावर कुटुंबीयांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून कुठलाही मोबदला न घेता त्यांना कायद्याचे धडे देणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक, वंजारी समाजाचा आधारवड हरपल्याने पुणे शहरासह नगर जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली होती.