Breaking News

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न सुरु  - आमदार आशुतोष काळे

कृषी संजीवनी सप्ताह सुरु असून या सप्ताहाच्या सांगता समारंभ प्रसंगी बोलतांना आमदार आशुतोष काळे.


कोपरगाव प्रतिनिधी  :- 
राज्यातील शेतकरी समुद्ध होवून आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे हे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण व्हावे या दृष्टीकोणातून महाविकास आघाडी सरकार वाटचाल करीत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकरी समृद्ध  व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे आमदार आशुतोष यांनी म्हटले आहे.
हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे १ जुलै ते ७ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कृषी संजीवनी सप्ताहाचा सांगता समारंभ नुकताच कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथे पार पडला याप्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तम जान असणारे महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. मागील वर्षी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने सरकारकडून १९.६७ कोटी रुपयांची मदत मिळवून दिली. चालू हंगामात शेतकऱ्यांनी खरेदी केलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाची निघाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची दखल घेवून बियाणे उत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांना निवीन बियाणे देण्यास भाग पाडले. काही बियाणे उत्पादक कंपन्यांवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल कायदेशीर कारवाई देखील केली. कृषी विभागाने शेतीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर घेवून गेले तरच शेतकऱ्यांची  प्रगती होणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने प्रयत्न करावे असे आवाहन आमदार आशुतोष यांनी केले. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव म्हणाले की, मागील वर्षी कोपरगाव तालुक्यात मका पिकाचे लष्करी अळीमुळे मोठे नुकसान झाले होते.मका पिकाला विमा कवच नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. मात्र यावर्षी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांमुळे मका पिकाला विमा संरक्षण देण्यात आले आहे. तसेच आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नातून शेततळे अस्तरीकरनाचे ६६ लाभार्थ्यांचे ४४ लाख ९८ हजार रुपयांचे अनुदान, कांदा चाळीचे ६६ लाभार्थ्यांचे ५७ लाख ५७ हजार रुपयांचे अनुदान व ३७४ शेतकऱ्यांना ४३ लाख ९० हजार रुपये ठिबक सिंचनाचे अनुदान शेतकऱ्यांना मिळवून दिले असल्याचे यावेळी सांगितले. याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ भरत दवंगे यांनी यावेळी पीक व्यवस्थापन व कीडनियंत्रणसंदर्भात सखोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ भरत दवंगे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. बोराडे, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, सरपंच वैशाली आभाळे, मोहनराव आभाळे, उत्तम कुऱ्हाडे, श्रीधर आभाळे, सोपान आभाळे, रोहिदास होन, राहुल रोहमारे, सुभाष आभाळे, राहुल जगधने, भाऊसाहेब कुऱ्हाडे, माधव आभाळे, हरिभाऊ जावळे, विठ्ठल जावळे, रंभाजी आभाळे, प्रमोद आभाळे, नामदेव गवळी आदी उपस्थित होते.