Breaking News

सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करा; प्रेयसीची मागणी !

सुशांतच्या आत्महत्येची बातमी कळताच अंकिता लोखंडे म्हणाली...
मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं आपल्या मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. कित्येकांसाठी ही घटना मानसिक धक्का देणारी होती. त्याच्या आत्महत्येमुळं अनेक अनुत्तरित प्रश्नांनी डोकंही वर काढलं. त्यातच आता त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिनं आत्महत्येच्या चौकशीबद्दल आपली प्रतिक्रिया देत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापुढे एक मागणी केली आहे. 
सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी रियानं शाह यांच्याकडे केली. सोशल मीडियावर सुशांतचा एक फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये तिनं आपली ही विनंतीपर मागणी केली. 
'माननीय अमित शाह सर, मी सुशांत सिंह राजपूत याची प्रेयसी रिया चक्रवर्ती. सुशांतच्या अकस्मात निधनाला आता महिना उलटला आहे. मला सरकारवर पूर्ण विश्वास आहे. किंबहुना न्यायव्यस्थेवरही विश्वास आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंतीपर मागणी करते की या प्रकरणीच्या सीबीआय चौकशीस सुरुवात करा. सुशांतला हे पाऊल उचलण्यासाठी नेमकं कोणत्या कारणानं प्रवृत्त केलं, हेच मला जाणून घ्यायचं आहे', असं रियानं तिच्या या पोस्टमध्ये लिहिलं. 
सध्याच्या घडीला सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या हाती आहे. ज्याअंतर्गत त्यांनी जवळपास ३० जणांचे जबाबही नोंदवले आहेत. रियाचही पोलिसांनी चौकशी केल्याचं कळत आहे. असं असतानाच सोशल मीडियावर रियाचा विरोधही केला जात आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर तिच्यावर अनेकांनीच निशाणा साधल्याची माहितीही समोर आली आहे. खुद्द रियानेच तिला येणाऱ्या धमक्या आणि शेलक्या शब्दांतील मेसेजचे स्क्रीनशॉट पोस्टही केले होते.
एकंदरच या प्रकरणाला मिळालेलं हे नवं वळण आणि रियाची मागणी पाहता केंद्रीय गृहमंत्री यामध्ये लक्ष घालतात का आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.