Breaking News

इंदुरीकर हाजीर हो!

- पुत्रप्राप्तीबाबतचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण
- 7 ऑगस्टरोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स

संगमनेर/तालुका प्रतिनिधी 
पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी हभप. निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांना पुढील महिन्यात 7 ऑगस्टरोजी हजर राहण्याचे आदेश संगमनेर न्यायालयाने दिले आहेत. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी इंदुरीकरांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची पहिली सुनावणी शुक्रवारी संगमनेर न्यायालयात झाली. मात्र आज केवळ समन्स बजावण्यात आला.
हभप. इंदुरीकर महाराज यांनी फेब्रुवारी महिन्यात पुत्रप्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत अनेक सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी इंदुरीकर महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी अ‍ॅड. रंजना गवांदे यांच्या तक्रारीनंतर 26 जून रोजी संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर शुक्रवारी संगमनेर न्यायालयात पहिली सुनावणी झाली. त्यात फक्त इंदुरीकर महाराज यांना समन्स बजावण्याची ऑर्डर काढण्यात आली.
याबाबत अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी दि.17 फेब्रुवारी रोजी अहमदनगरच्या शल्यचिकित्सकांकडे पहिल्यांदा तक्रार केली. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती सह अनेक सामाजिक संघटनांनी याबाबत तक्रारी दिल्या. त्यानुसार राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त संचालिका डॉ. अर्चना पाटील यांच्या आदेशावरून संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भास्कर भवर यांनी दि.19 जून रोजी इंदुरीकर महाराजांविरोधात संगमनेर न्यायालयात (वैद्यकीय कायदा) पीसीपीएनडीसी कायद्याचे कलम 22/1/2 प्रमाणे फिर्याद दाखल केली. याप्रकरणात आता इंदुरीकर महाराज यांना जर जामीन घ्यायचा असला तरीही त्यांना दिलेल्या तारखेला न्यायालयात हजर राहून जामीन घ्यावा लागेल, आणि जर त्यांना गुन्हा मान्य नसेल तर त्यांना वरच्या न्यायालयात दाद मागण्याची संधीदेखील आहे.

निवृत्ती महाराज इंदुरीकर काय बोलले होते?
स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी संतती होते. जर टायमिंग हुकला की क्वॉलिटी खराब. पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, अशा प्रकारचे वक्तव्य इंदुरीकरांनी केल्याचा आरोप आहे. अपत्यप्राप्तीसाठी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकरांनी वाद टोकाला गेल्यावर दिलगिरीदेखील व्यक्त केली होती.