Breaking News

शेतकरी मराठा महासंघाची तीव्र आंदोलनाची हाक

- बोगस बियाणेप्रकरणी नगरचे कृषी अधिकारी, बियाणे कंपन्यांवर कारवाईची मागणी- शेतकरी मराठा महासंघाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन- 25 जुलैपासून कृषी आयुक्तालयात आंदोलनाचा इशारा


अहमदनगर/प्रतिनिधी
बोगस प्रतीचे बियाणे विकून शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या कंपन्या, तसेच खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकर्‍यांची लूट करणारे कृषी दुकानदार यांना पाठिशी घालणार्‍या कृषी खात्याच्या अधिकार्‍यांवर आणि बोगस बियाणे विक्री करणार्‍या कंपन्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा, 25 जुलैपासून सनदशीर मार्गाने व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी मराठा महासंघाच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
शेतकरी महासंघाचे अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे यांनी सांगितले, की नगर जिल्ह्यात निकृष्ट व बोगस बियाणे विक्री करण्यात आल्याने 981 शेतकर्‍यांचे बियाणे उगवलेले नाहीत. त्याबाबत मात्र महिना उलटला तरी कृषी विभागाने फक्त दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल केले. इतर कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी त्यांना पाठिशी घातले जात आहे. तसेच, नगर जिल्ह्यात युरिया खताची टंचाई निर्माण करून काही दुकानदार चढ्या भावाने तसेच खतांची लिंकिंग करून विक्री करत आहेत. याबाबतची कृषी विभागाचे अधिकारी दुकानदारांना पाठिशी घालत आहेत. बियाणे उगवन झाले नाही तसेच खतांची टंचाई यामुळे शेतकरी त्रस्त असताना बियाणे कंपन्या व दुकानदार यांना पाठिशी घालणार्‍या नगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करून बोगस बियाणे विक्री करणार्‍या कंपन्यांना नगरसह महाराष्ट्रात बियाणे विक्रीला बंदी घालावी, अशी मागणीही संभाजीराजे दहातोंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. अन्यथा, 25 जुलैपासून कृषी आयुक्त कार्यालयात आंदोलनाचा इशारा दिला आहे.