Breaking News

युद्ध असले तरी निवडणुका घ्या; राजकीय आरक्षण संपवावे!

युद्ध असले तरी निवडणुका घ्या, कोरोना हे सरकारचे नाटक!
- ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणूक प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची टीका
- राज्यपालांची घेतली भेट

मुंबई / प्रति
निधी
युद्ध असले तरी निवडणुका घेतल्याच पाहिजे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. तसेच कोरोना हे शासनाचे नाटक असल्याचा अजब दावा आंबेडकर यांनी केला. मागच्या वर्षीच्या मृत्यू दरापेक्षा यावर्षीचा मृत्यू दर खूप कमी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोरोनाच्या नावाने सरकार आपलेच राज्य चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केल. शुक्रवारी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर राजकीय प्रशासक नेमणुकीला प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. त्यांनी राजकीय पक्षांनी दुकानदारी उघडल्याचा आरोप देखील केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पत्राचा दाखला देत प्रशासक नेमणुकीसाठी 11 हजार रुपयांचा पक्ष निधी घेऊन दुकानदारी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासनाची शपथ घेतलेल्या व्यक्तीलाच प्रशासक म्हणून नेमता येते ही बाब त्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली. प्रशासकांच्या नेमणुका राज्यपालांच्या परवानगीशिवाय होऊ नये, यासाठी आंबेडकर यांनी विनंती केली.

राजकीय आरक्षण संपवावे
राजकीय आरक्षण दहा वर्षासाठी होते, ते वाढवू नये अशी आमची भूमिका आहे, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले. राजकीय आरक्षण संपवावे अशी आमची मागणी आहे. शिक्षण आणि नोकरीत दिले जाणारे आरक्षण सर्वांना मिळावे यासाठी फॉर्म्युला तयार करण्याची मागणी त्यांनी केली. ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला नाही त्यांना आधी आरक्षणाचा लाभ मिळावा आणि ज्यांना यापूर्वी लाभ मिळाला त्यांना नंतर आरक्षण मिळावे, असे त्यांनी सांगितले. एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर त्या कुटुंबाला आरक्षणाचा लाभ शेवटी मिळावा, असे सांगून आंबेडकर म्हणाले, की आरक्षणाच्या यादीत कधीही आरक्षणाचा लाभ न घेतलेल्या कुटुंबातील व्यक्तीचे नाव आधी असावे आणि ज्या कुटुंबाने पूर्वी आरक्षणाचा लाभ घेतला असेल त्या कुटुंबातील व्यक्तीचे नाव शेवटी असावे, असे ते म्हणाले.