Breaking News

ऐश्‍वर्या, आराध्या रुग्णालयात

- ताप वाढू लागल्याने भरती

मुंबई/प्रतिनिधी
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यानंतर आता अभिनेत्री ऐश्‍वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
ऐश्‍वर्या रायमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. तिला हलका ताप आला आहे. त्यानंतर ऐश्‍वर्यासह आराध्यालाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. तर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर आधीपासूनच नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 11 जुलैला रात्री बिग बींना श्‍वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचे निदान झाले, त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. यानंतर ऐश्‍वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीने कोरोना चाचणी करण्यात आली. 12 जुलैला ऐश्‍वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्‍वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ऐश्‍वर्या आणि आराध्याला सुरुवातीला होम क्वारंटाइन करण्यात आले होते. आता त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.