Breaking News

कोपरगाव बाजार समितीत काटला काढल्यास कारवाई!

कोपरगाव बाजार समितीत काटला काढल्यास कारवाई!

सभापतींचे स्पष्टीकरण दै.लोकमंथन वृत्तमालिकेस यश
गणेश दाणे/कोपरगाव प्रतिनिधी :-
कोपरगाव तालुका बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीस नेलेल्या भुसार मालावरती बाजार समितीचे व्यापारी प्रति क्विंटल एक किलो प्रमाणे घट धरुन वर्षानुवर्षे शेतकऱ्यांची लुट करत असल्याची वृत्तमालिका दै.लोकमंथनने सलग तिन भागात प्रकाशित करुन यावर प्रकाश टाकला होता.त्याची दखल घेत बाजार समितीने काटला काढणाऱ्या व्यापारी वर्गाबद्दल कडक धोरण स्विकारुन इथुन पुढे शेतकऱ्यांचा काटला काढल्याची तक्रार प्राप्त झाल्यास कडक धोरण अवलंबणार असल्याचे स्पष्टीकरण बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे आणि सचिव परसराम सिनगर यांनी दै.लोकमंथनला दिले आहे.

     कोपरगाव बाजार समिती आणि नव्याने स्थापन झालेल्या शिरसगाव उपबाजार समितीत नियमबाह्य प्रति क्विंटल एक किलो घट धरुन व्यापारीवर्ग शेतकऱ्यांची लुटमार करत असल्याची वृत्तमालिका दै.लोकमंथनने सलग तिन भागात क्रमशः प्रकाशित केल्यानंतर तालुका निबंधकांनी देखील याबाबत बाजार समितीकडून खुलासा मागितला होता.व्यापारी वर्ग मोठ्या चतुराईने हि चोरीची अनधिकृत रक्कम पावतीच्या पाठीमागे लिहुन हिशोब जुळवुन देत होती.याबाबत सर्व संचालक कर्मचारी वर्ग बघुन न बघितल्यासारखे करत होते.दैनंदिन हजारो रुपये शेतकऱ्यांचे लुटले जात  होते.इलेक्ट्रॉनिक काट्यावरील मोजमाप व्यापारी वर्ग मान्य करत नव्हते. मात्र लोकमंथनने यावर आवाज उठविल्यानंतर आता बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे यांनी व्यापाऱ्याने जर शेतकऱ्यांना वजनमापात अनधिकृत घट देऊन काटला काढल्यास आणि तसा प्रकार आमच्या निदर्शनास आणुन दिल्यास थेट त्या व्यापाऱ्याचा परवानाच रद्द करणार असल्याचे स्पष्टिकरण दिले आहे.

     याशिवाय शिरसगाव उपबाजार समितीत शेतकऱ्यांसाठी शौचालय आणि पाण्याची व्यवस्था लवकरच करण्यासाठी ग्रामपंचायतला तशे लेखी पत्र देणार असल्याचा खुलासाही यावेळी त्यांनी केला आहे.


 बाजार समिती अधिनियम १९६३नियम १९६७ कलम ३९ चा कायदा वर्षानुवर्षे बाजार समितीकडून पायदळी तुडविला जात होता.मात्र आता बाजार समितीला जाग आली असुन आता व्यापाऱ्याने काटला काढल्यास बाजार समितीने व्यापाऱ्याचा थेट परवाना रद्द केल्यास  खऱ्या अर्थाने हा कायदा अंमलात आल्याची अनुभूती शेतकऱ्यांना अनुभवता येणार आहे.