Breaking News

प्रीतम मुंडे राज्यात, पंकजा मुंडे केंद्रात

- भाजपची कार्यकारिणी जाहीर
- पंकजा मुंडेंना प्रदेश कार्यकारिणीत स्थान नाही

मुंबई/प्रतिनिधी 
राज्याचे लक्ष लागलेल्या भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर झाली. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे राज्यात पंकजा मुंडे यांना मोठी जबाबादारी दिली जाईल असे म्हटले जात होते, मात्र त्यांच्याऐवजी खासदार प्रीतम मुंडे यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे.
पंकजाताईंना केंद्रात कार्यकारिणीत चांगली जबाबदारी मिळेल, कोअर कमिटीच्या सदस्या शंभर टक्के असतील, केंद्राची जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या दोनवेळा खासदार आहेत त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी, पंकजाताई किंवा एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे यांना जबाबदारी दिली असे नाही, असेही स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिले. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोना संकटामुळे भाजपची कार्यकारणी घोषित करायची राहिली होती. कोणतीही घोषणा सगळ्यांशी बोलून, सगळ्यांना बरोबर घेऊन करायची असते. त्यामुळे थोडा वेळ लागला. माझ्याबरोबर 12 प्रदेश उपाध्यक्ष आहेत. 5 सेक्रेटरी म्हणजेच सरचिटणीस आहेत. या व्यतिरिक्त एक महामंत्री संघटन म्हणजे सरचिटणीस संघटण असे 6 सरचिटणील आहेत. 1 कोषाध्यक्ष व्यतिरिक्त 12 सरचिटणीस आहेत. कार्यकारणी सदस्य 69 असतील. निमंत्रित सदस्य 139 जण असतील. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य असतात. राज्याच्या सर्व सामाजिक स्तर आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देण्यासाठी या कार्यकारणीचा उपयोग होईल. नागपूरचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महामंत्री आहेत. आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, श्रीकांत भारती महामंत्री आहेत. विजय पुराणिक महामंत्री संघटक आहेत.
भाजपची कार्यकारिणी महामंत्री - सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक.उपाध्यक्ष - माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकूर.