Breaking News

अग्रलेख : भास्करराव आव्हाड : ज्ञानसूर्य हरपला!

अग्रलेख : भास्करराव आव्हाड : ज्ञानसूर्य हरपला!

ज्या मराठा आरक्षणासाठी लाखाचे मोर्चे निघाले, मराठा समाजाने ४० जणांचे बलिदान दिले. ज्या समाजाच्या हाती सत्ता आणि प्रशासकीय यंत्रणा आहे; त्या मराठा समाजाला अद्यापही आरक्षण प्राप्त होऊ शकले नाही. या उलट रक्ताचा थेंबही न सांडता, आणि समाजातील एकही तरुण रस्त्यावर न उतरू देता वंजारी समाजाला एनटी-डी प्रवर्गात स्वतंत्र दोन टक्के आरक्षण मिळवून दिले. ज्यायोगे आज समाजातील बहुसंख्य तरुण-तरुणीच्या हातातून कोयता सुटून हा समाज प्रशासन, सत्ताकारणाचा अविभाज्य भाग बनला, असे थोर कायदेपंडित आणि वंजारी समाजातील ज्ञानसूर्य भास्करराव आव्हाड यांचे शुक्रवारी निधन झाले. जन्माला आलेला प्रत्येकजण मरणारच आहे; तरीदेखील कुणाचे मरणही समाजऋण बनून जाते, असे मरण भास्करराव आव्हाड यांना लाभले. त्यांच्या मृत्यूने ते आपल्या कार्याची अविट छाप समाजावर तर सोडून गेलेच; समाजाला आपल्या कर्तृत्वाने ऋणीदेखील करून गेले. पुढील असंख्य पिढ्या त्यांच्या कार्याची महती गात राहतील. नगर जिल्ह्यातील पाथर्डीसारख्या कायम दुष्काळी भागातील चिंचोडी शिराळ या खेड्यात भास्करराव आव्हाड यांचा जन्म झाला होता. पुण्यातील आय.एल.एस. विधी महाविद्यालयातून त्यांनी सुवर्णपदकासह विधी शाखेचे उच्चशिक्षण पूर्ण केले. बरेच वर्षे ते विधी महाविद्यालयात प्राध्यापकी करत होते. तब्बल साडेतीन दशके त्यांनी राज्याला नामवंत वकील आणि न्यायाधीश दिलेत. गर्वाने नमूद करावे वाटते, की राज्यातील विविध जिल्हा व तालुका न्यायपालिकांमध्ये कार्यरत असलेले तब्बल एक हजारपेक्षा जास्त न्यायाधीश हे भास्करराव आव्हाड यांचे विद्यार्थी राहिलेले आहेत. याशिवाय, राज्यभरात १५ हजारपेक्षा जास्त वकिली व्यवसाय करणारे वकील त्यांचे विद्यार्थी आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील विविध नामांकित वकिलांचा समावेश होतो. म्हणूनच भास्करराव आव्हाड म्हणजे न्यायाधीश तयार करण्याची फॅक्टरी, असा गर्वाने उल्लेख केला जात होता. त्यातूनच त्यांचे मोठेपण अधोरेखित होते. अत्यंत प्रतिष्ठेचे समजल्या जाणार्‍या महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा बार कौन्सिलचे ते काही काळ अध्यक्षदेखील होते; तसेच अनेक वर्षे सदस्यदेखील ते राहिलेत. केवळ भास्कररावच नाहीत तर त्यांचे बंधू अ‍ॅड. सुधाकरराव आव्हाड हेसुद्धा बार कौन्सिलचे अध्यक्ष राहिले आहेत. सध्या त्यांचे चिरंजीव अविनाश हे मुंबई उच्च न्यायालयातील प्रथितयश विधिज्ज्ञ आहेत तर पुतणे अरविंद सुधाकरराव आव्हाड हे दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयातील प्रथितयश विधिज्ज्ञ आहेत. भास्करराव हे चालते बोलते विद्यापीठच होते. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना त्यांचा मोठाच आधार होता. खास करून नगर, किंवा मराठवाड्यातील खेड्यापाड्यातून पुणे येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना तर हमखास भास्कररावांचा आधार मिळायचा. त्यांचा आव्हाड क्लास हा ख्यातनाम खासगी शिकवणी वर्ग होता. या क्लासची फी ज्या गरीब विद्यार्थ्यांना भरणे जमत नव्हते, अशा विद्यार्थ्यांना या क्लासमध्ये मोफत शिकवणी तर मिळेच; परंतु अडीअडचणीला भास्कररावांची मदतही मिळत होती. म्हणूनच, त्यांनी राज्याला सर्वाधिक न्यायाधीश दिलेत, हे अभिमानाने सांगता येते. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेऊनदेखील भास्कररावांनी वकिली व्यवसायात मिळवलेले यश खरोखर गौरवास्पदच म्हणावे लागेल. वंजारी समाजाचा भटक्या जमाती प्रवर्गात समावेश व्हावा, यासाठी जो न्यायालयीन लढा चालला, त्यामध्ये भास्करराव हे अग्रणी होते. या लढ्याची कायदेशीर बाजू त्यांनीच सांभाळली व आपले कायद्याचे ज्ञान पणाला लावले. म्हणूनच वंजारी समाजाला एनटी-डी प्रवर्गाचे स्वतंत्र दोन टक्के आरक्षण मिळाले. या प्रक्रियेतील त्यांचा सिंहाचा वाटा पाहाता, या आरक्षणाचे खरे श्रेय हे त्यांनाच द्यावे लागेल. म्हणून वंजारी समाज त्यांचा कायम ऋणी राहील. असे असले तरी भास्कररावांचे काम केवळ आपल्या जातीपुरते मर्यादित कधीच नव्हते. त्यांनी राज्याला जे हजारो न्यायाधीश आणि वकील दिलेत, त्यात बहुजन समाजातील गोरगरिब तरुण-तरुणींचा समावेश आहे. बदलते कायदे व वकिली आणि न्यायालयीन व्यवस्थेबाबत त्यांनी राज्यभरात शेकडो व्याख्याने दिली आहेत. विविध वृत्तपत्रे, मासिके, दिवाळीअंक यातून लेखन करून समाजात कायद्याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी त्यांनी लिहिलेले लेख वाचनीय ठरले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांनी अनेक पुरस्कारांनी त्यांचा यथोचित सन्मानही केला होता. पुणेकरांनीही १५ वर्षांपूर्वी समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याहस्ते केला होता. भास्करराव हे केवळ कायद्याचे पंडित, विधिज्ज्ञच नव्हे तर संतसाहित्याचे अभ्यासक, कीर्तनकार आणि निरुपणकारदेखील होते. ते संवेदनशील कवीदेखील होते. त्यांचे साहित्य समाजाच्या विविध अंगांना स्पर्श तर करतेच; परंतु त्यांचे अध्यात्मिक साहित्य भारतीय अध्यात्माची महतीदेखील विषद करते. ज्ञान देताना आणि मदतीला धावून जाताना त्यांनी कधीच जात पाहिली नाही. वकिली क्षेत्रातील गुरू द्रोणाचार्य म्हणून त्यांचा उल्लेख नेहमी केला जाईल. ते खर्‍याअर्थाने महाराष्ट्रभूषण, समाजभूषण होते. खरे तर वयाच्या अवघ्या ७७ व्यावर्षी आणि तब्येत तशी ठणठणीत असताना त्यांनी असे अकाली जाणे धक्कादायकच आहे. परंतु, महामारी कोरोनाच्या ाfवळख्यात अडकून हा ज्ञानसूर्य लोप पावला. पुण्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यांची चाचणीही पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. काळाने अशा या महान व्यक्तिमत्वावर घाला घालून बहुजन समाजाचे मोठेच नुकसान केले. त्यांच्या पावन स्मृतीस आम्ही विनम्र अभिवादन करत आहोत! त्यांच्या अकाली जाण्याचे दुःख खूपच मोठे आहे, हे दुःख पेलण्याची शक्ती ईश्वर बहुजन समाज आणि त्यांच्या कुटुंबीयांना देवो, हीच प्रार्थना.