Breaking News

राजगृहाबाहेर तोडफोड; मुख्य आरोपीला कल्याणमध्ये अटक

राजगृहाबाहेर तोडफोड; मुख्य आरोपीला कल्याणमध्ये अटक
मुंबई/प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादरमधील 'राजगृह'बाहेर तोडफोड करणार्‍या मुख्य आरोपीला गजाआड करण्यात माटुंगा पोलिसांना यश आले आहे. विशाल मोरे उर्फ विठ्ठल काण्या (वय २०) असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत.
दादरमधील राजगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून ७ जुलैच्या सायंकाळी पाच ते साडे पाचच्या सुमारास एका अनोळखी तरुणाने आत प्रवेश करत येथील आठ ते दहा झाडांच्या कुंड्या उचलून फोडल्या. त्यानंतर त्याने घराच्या खिडक्यांवर दगडफेक करून पळ काढला. या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. अखेर माटुंगा पोलिसांनी भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची फिर्याद नोंदवून घेत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. राजगृहा बाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोडफोडीचा हा सर्व प्रकार कैद झाला होता. एक अनोळखी तरुण तोडफोड करताना तर, त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसली. या आधारे पोलिसांनी उमेश जाधव (वय ३५) याला अटक केली. त्याच्याकडे चौकशीमध्ये तोडफोड करणार्‍या तरुणाचे नाव कालीया आहे. पदपथावर भटकत असताना काही दिवसांपूर्वी त्याच्याशी आपली ओळख झाल्याची माहिती जाधव याने पोलिसांना दिली. पोलिसांनी अखेर दादर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. यात संशयित आरोपी दादरमधून पुढे पूर्व द्रुतगती महामार्गाने ठाण्याच्या दिशेने चालत जाताना पोलिसांना दिसला. त्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज न मिळाल्याने माटुंगा पोलिसांनी या आरोपीची माहिती ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांना देत त्याचा शोध सुरु केला. आरोपी कल्याण स्थानक फुटपाथवर वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. याच माहितीच्या आधारे माटुंगा पोलिसांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी विशाल मोरे उर्फ विठ्ठल काण्या याला ताब्यात घेतले. तोडफोड करणारा हाच तो आरोपी असल्याची तपासात उघड झाले. तसेच आरोपीनेही गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.