Breaking News

रामदेवबाबांच्या औषधाचा मार्ग मोकळा

- केंद्राकडून सशर्त परवानगी
- रामदेवबाबा यांची घोषणा

नवी दिल्ली/वृत्तसंस्था 
योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजलीच्या कोरोनिल या कोरोना रोगावरील कथित औषधीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.  केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर आता संपूर्ण देशभरात हे किट उपलब्ध करणार आहे, अशी घोषणा रामदेवबाबांनी केली. आयुष मंत्रालयाने  या औषधाच्या विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने औषधाला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
रामदेवबाबा  यांनी कोरोनावरील औषध म्हणून सुरुवातील हे किट लाँच केले होते. यानंतर केंद्रीय आयुष मंत्रालय आणि उत्तराखंड आयुष विभागानेही पतंजलीला नोटीस बजावली. पतंजलीने औषध आणि त्याच्या क्लिनिकल ट्रायलचे दस्तावेज सरकारला दिले. यानंतर केंद्राने या औषधाच्या विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. आता हे औषध देशभरात उपलब्ध केले जाणार आहे. रामदेवबाबा म्हणाले, आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार दिव्य कोरोनिल टॅबलेट, दिव्य श्‍वासारी वटी आणि दिव्य अणु तेल यावर आता प्रतिबंध नाही. याला स्टेट लायसेन्स अथॉरिटी, आयुर्वेद-युनानी सर्व्हिसेस आणि उत्तराखंड सरकारमार्फत उत्पादन आणि वितरणाची पतंजलीला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार संपूर्ण भारतात हे किट उपलब्ध करू शकतो. तसेच,  केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाला आपण आपले क्लिनिकल ट्रायलसंबंधी दस्तावेज दिलेत. यानंतर कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी पतंजली रिसर्च फाऊंडेशनने आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पार पाडलेल्या आहेत, हे आयुष मंत्रालयाने स्वीकारले आहे. आम्ही आयुर्वेदिक औषधांचे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर पहिले यशस्वी क्लिनिकल कंट्रोल ट्रायल केले आता आम्ही मल्टिसेंट्रिक क्लिनिकल ट्रायल करणार असल्याचेही रामदेव बाबा यांनी सांगितल.