Breaking News

उदयनराजेंचा दिल्ली दरबारी अपमान?

उदयनराजेंचा दिल्ली दरबारी अपमान?
- शिवसेना नेते संजय राऊत यांची भाजपवर टीका
- कालच्या शपथविधीनंतर आज उदयनराजेंना मागच्या रांगेत बसवले

नवी दिल्ली/प्रतिनिधी
भाजपनेते खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी...जय शिवाजी' असा जयघोष करत शपथ पूर्ण केली. उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली. नायडू यांच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेले २० लाख पत्रे नायडू यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली. ही घटना होत नाही तोच गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीत उदयनराजे यांना मागच्या रांगेत बसविण्यात आले. त्यावरूनही भाजपवर जोरदार टीका केली जात आहे.
राज्यसभेच्या सदस्यत्वाी शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी...जय शिवाजी' असा जयघोष करत शपथ पूर्ण केली. उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली. 'हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी', अशी सूचनाही केली. यानंतर विविध स्तरावर नायडू यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विट करत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? असा सवाल केला. तसेच, भाजपचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे असे म्हटले. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली, सातारा बंदची अद्याप घोषणा नाही, असा अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित करत, जय भवानी!जय शिवाजी! अशी घोषणाही त्यांनी ट्विटमध्ये दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अयोध्या राम मंदिर भूमिपूजनासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाकडून मोहीम राबवली जात असून ‘जय श्रीराम’ लिहिलेली १० लाख पत्रे पाठवली जाणार आहेत. भाजपच्या याच मोहिमेला राष्ट्रवादी काँग्रेस व्यंकय्या नायडूंना २० लाख पत्रे पाठवून उत्तर देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
--
तसे काही घडलेच नाही; अन्यथा सभागृहातच राजीनामा दिला असता - उदयनराजे
-----------------
राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झालाच नाही. सभागृहात असे काही घडलेच नाही, असे सांगतानाच महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच खासदारकीचा राजीनामा दिला असता, असे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका, जे घडले नाही, त्याचा बाऊ करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही होते. तुम्ही त्यांना विचारू शकता असे काही घडले का? तेही सांगतील. मी पवारांसोबत काम केले आहे. त्यांनी मला नेहमीच मार्गदर्शन केले. कालही वेगळे काही घडले असते तर त्यांनी मला त्यावर प्रतिक्रिया द्यायला सांगितली असती. पण काही घडलेच नव्हते. त्यामुळे तेही काही बोलले नाहीत, असेही उदयनराजे म्हणाले.
---------------------------