Breaking News

माथेफिरू तरुणाचा अल्पवयीन मुलीवर खुनी हल्ला

- मुलीने नकार दिल्यानंतर लहान चुलत बहिणीवर चाकूचे सपासप वार
- नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथील थरारक घटना

नेवासा फाटा/ प्रतिनिधी 
नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथील एका विद्यार्थिनीला गावातीलच एका माथेफिरू युवकाने मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणत तिचा विनयभंग केला होता. या युवकाला सदर विद्यार्थिनीने नकार देत खडेबोल सुनावले होते. त्यामुळे संतापलेल्या या माथेफिरूने मी तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. मुलीने नकार दिल्याचा राग मनात धरुन युवकाने थेट मुलीच्या वस्तीवर जात तिच्या घरात घुसून 12 वर्षाच्या तिच्या लहान चुलत बहिणीवर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. या घटनेची फिर्याद देण्यासाठी पोलिसांत गेलेल्या मुलीच्या वडिलांना पोलिसांनी मात्र थारा दिला नाही व गुन्हादेखील दाखल केला नाही, अशी घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर असे, की इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेली ही युवती गिडेगाव येथून शिरसगाव येथे महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी ये - जा करत असते. गावातीलच एक युवक या युवतीचा पाठलाग करून वारंवार विनयभंग करत असे. मात्र ही मुलगी नेहमी नकार देत असल्याने एकतर्फी प्रेमातून हा माथेफिरू युवक आठ दिवसापूर्वी या मुलीच्या घरी आला. त्यावेळी महाविद्यालयीन युवती शेतात गेलेली असताना तिची लहान चुलत बहीण घरात असल्याने या लहान बहिणीवर चाकूने सपासप वार करुन हा माथेफिरू युवक पसार झाला. या थरारक घटनेने हादरलेले मुलीचे कुटुंबीय प्रचंड दहशतीखाली आले होते.

या घटनेची फिर्याद दाखल करण्यासाठी मुलीचे वडील व त्यांची महाविद्यालयीन मुलगी नेवासा पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांनी मात्र थारा न देता त्यांची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. तसेच, उलट वडिलांनाच दमबाजी करून तेथून जाण्यास सांगितल्याचे या मुलीच्या वडिलांनी सांगितले आहे. या गंभीर प्रकाराकडे कानाडोळा करत माथेफिरू युवकास अभय देणार्‍या नेवासा पोलिस ठाण्यातील संबंधित पोलिस अधिकार्‍यांना तातडीने निलंबित करून त्यांची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.