Breaking News

एसटी महामंडळाकडून दीड हजार कर्मचार्‍यांना नारळ!

- कोरोनामुळे लालपरी एसटीला लागला ब्रेक


मुंबई/प्रतिनिधी
राज्यावर आलेल्या कोरोना महामारीमुळे लालपरी समजली जाणारी एसटी बसला ब्रेक लागला आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेत सुमारे दीड  हजार कर्माचार्‍यांना नारळ दिला आहे. कर्मचार्‍यांची सेवा खंडित केली असून, महामंडळाने घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचे पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आले आहे. 2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित करण्यात आली. कोरोना लॉकडाऊनमुळे एसटी बंद असल्याने उत्पन्न ठप्प झाले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे महामंडळाने स्प÷ष्ट केले. सरळसेवा 2019 मध्ये भरती झालेले चालक-वाहक यांची सेवा तात्पुरती खंडित करावी, भविष्यात गरज असेल तर ज्येष्ठतेनुसार पुन्हा सेवेत घ्यावे, चालक-वाहक, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, अन्य अधिकारी किंवा अनुकंपा तत्वावरील जे उमेदवार प्रशिक्षण घेत असतील, त्याचे प्रशिक्षण थांबवावे, कोरोना संकट टळल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचार्‍यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतले जाईल, असेही पत्रकात म्हटले आहे. जवळपास दीड हजार वाहक, चालकांसह इतर कर्मचार्‍यांची सेवा खंडीत करण्यात आली आहे. ज्या कर्मचार्‍यांच प्रशिक्षण सुरु आहे, अशांना थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रत्येकाची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा परिस्थितीत कोणाला नोकरीवरुन काढू नका, असे आवाहन सरकारने केले आहे. मात्र, सरकारच्या ताब्यात असलेल्या एसटी महामंडळाने आपल्या कर्मचार्‍यांची सेवा स्थगित केली आहे.


कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे सध्या एसटी महामंडळाची सेवा कमी प्रमाणात सुरु आहे. याचा फटका एसटीच्या कमाईला बसला. त्यामुळे सध्या कंत्राटी पदावर काम करणार्‍या 1500 कर्मचार्‍यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. लवकरच टाळेबंदी संपल्यानंतर या कर्मचार्‍यांना आम्ही पुन्हा सेवेत घेऊ. कर्मचार्‍यांना कामावरुन काढून टाकले नाही तर त्यांची काही दिवसांसाठी सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. सेवा खंडित करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांमध्ये चालक-वाहकांसोबतच सहाय्यक लिपिक, टंकलेखक यांचा समावेश आहे. कामगार संघटनांनी मात्र ही संख्या चार हजारांच्या आसपास असल्याचे म्हटले आहे.