Breaking News

कोपरगाव बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट, भूसार मालाच्या वजनकाट्याचा वाद !

गणेश दाणे/कोपरगाव प्रतिनिधी :
      "विना सहकार नही उद्धार"या ब्रीदशी एकरुपता दर्शवुन सहकाराची गंगोत्री असलेल्या कोपरगाव तालुक्यातील केंद्रस्थानी असलेल्या बाजार समितीत भूसार माल खरेदीत दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची लूट होत आहे.आधिच बियाणांत फसवणूक त्यात व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या लूटीने सध्या  शेतकरी त्रस्त आहे.वजन काट्याबाबत शेतकऱ्यांचे सदैव ,व्यापारी आणि संचालक मंडळात वाद होतात मात्र यावर तेथील  कारभारी मात्र मांजरासारखे डोळे मिटुन कानावर हात ठेवत व्यापाऱ्यांचीच बाजु धरत असल्याचे निदर्शनास येते.

       तालुक्यातील राजकीय श्रेष्ठींनी एकत्रितपणे बाजार समितीवर कब्जा मिळविला.मात्र सध्या शेतकऱ्यांची व्यापारी वर्गाकडून होणारी लूट थांबवायला मात्र कुणीही पुढे येत नाही.सचिव अध्यक्ष यांचेकडे तक्रार करुनही ते ही व्यापाऱ्यांच्या आदेशावरच नाचत असल्याची त्यांची देहबोलीच सांगते.शेतकऱ्यांनी भुसार माल बाजार समितीत आणल्यानंतर लिलाव झाला की,इलेक्ट्रॉनिक काट्यावर मालाचे वजन करायचे ठरविल्यास शेतकऱ्यांना व्यापारी विरोध का करतात?तेथील वजन क्विंटलमागे एक किलो कमी धरण्याची भाषा वापरतात कारण त्यावर त्यांना वजन कमी दाखवत असल्याची शंका येते. मग शेतकऱ्यांनीही व्यापाऱ्यांच्या वजन काट्यावर का म्हणुन विश्वास दाखवावा हा खरा प्रश्न आहे.

     या एक किलो काटलाच्या चिरीमिरीबाबत शेतकऱ्यांत तीव्र असंतोष खदखदत असुन, अध्यक्ष सचिवांना विचारणा केली असता,त्यांनी याबाबत खुलासा देताना सांगितले की,व्यापाऱ्यांच्या मतानुसार इलेक्ट्रॉनिक काट्यात आणि वजन काट्यात दहा बारा किलोचा फरक पडतो.अशे व्यापारी वर्गाचे म्हणणे असुन त्यामुळे ते नियमबाह्य काटला काढणार असल्याचे मान्य करत व्यापारी ऐकत नसल्याची कबुली देत पुढील मिटींगमध्ये याबाबत निर्णय घेणार असल्याचे सभापतींनी सांगितले.

             ◆ वजन काट्यांची व्हावी चौकशी 

ज्या इलेक्ट्रॉनिक काट्यांवर व्यापारी वर्गाचा भरवसा नाही ती इलेक्ट्रॉनिक काटे आणि व्यापाऱ्यांची वजनमापे यात ज्याची तफावत पडेल त्यांचेवर कारवाई व्हावी अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.

     ◆ बाजार समितीचे पदाधिकारी नावापुरतेच

बाजार समितीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणुन कारभार पाहणारे संचालक मंडळांनी वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणे त्यांचे आद्यकर्तव्य आहे.मात्र ते सर्व तक्रारी ऐकुणही बघ्याच्या भूमीकेत राहुन व्यापारी धार्जिने दिसुन येत असल्यामुळे ते  नावापुरतेच असल्याचे शेतकरी बोलतात