Breaking News

पवारांच्या विधानावरून राजकारण पेटले!

- पवारांचा विरोध मोदींना नसून प्रभू श्रीरामचंद्रांना - उभा भारती कडाडल्या- कोरोनाचे अपयश लपविण्यासाठी भाजपकडून पायाभरणीचा कार्यक्रम - मंत्री थोरात- उद्धव ठाकरेंना अयोध्येत जाण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही - संजय राऊत


नवी दिल्ली/खास प्रतिनिधी
अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केल्याने कोरोना पळून जाणार आहे का? अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर राजकारण चांगलेच पेटले आहे. शरद पवार यांनी केलेले राम मंदिराबद्दलचे वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील नाही तर प्रभू रामचंद्रांच्या विरोधातील आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या साध्वी उमा भारती यांनी केली. तर कोरोनाच्या काळात केंद्र सरकारच्या अपयशावरून इतरांचे दुर्लक्ष व्हावे म्हणूनच राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला जात असल्याची टीका भाजपवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पायाभरणीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाणार असून, त्यासाठी आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही, असे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी भाजपला बजावले आहे. एकूणच पायाभरणी समारंभावरून चांगलेच रामायण चालू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
रामाचे मंदिर बांधून करोना निघून जाईल असे मोदी सरकारला वाटते आहे, त्यामुळे या मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख आणि इतर चर्चा होत आहेत. राम मंदिरामुळे करोना दूर जाणार आहे का? असा प्रश्न ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला केला होता. राम मंदिर बांधून करोना दूर जाणार असेल तर खुशाल भूमिपूजन करा, असेही त्यांनी काल सोलापुरात म्हटले होते. पवार यांनी केलेल्या याच वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत. भाजपच्या फायरब्रांड नेत्या उमा भारती यांनी या वकव्याचा संदर्भ घेऊन शरद पवारांवर टीका केली. शरद पवार यांनी केलेले वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणारे नाही तर थेट प्रभू रामचंद्रांना विरोध करणारे असा आरोप त्यांनी केला. तर कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. कोरोनाच्या संकटकाळात राममंदिराचे भूमिपूजन इतके महत्त्वाचे आहे का, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी मुंबई प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की श्रीराम दैवत आहे. पण रामाचे दर्शन घ्यायला आपण जगले पाहिजे. आपण जगलो तर रामाचे दर्शन घ्यायला जाऊ. त्यामुळे केंद्र सरकारने आता माणसे जगवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मात्र, केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात सरकारच्या अपयशावरून दुर्लक्ष करण्याकरता हा राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. या भूमिपूजन सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याविषयी बाळासाहेब थोरात यांना विचारले असता, तो त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे, अशी त्रोटक प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.