Breaking News

बाप्पा पावले; कोकणात जाण्यासाठी एसटीची सोय!

- परिवहन मंत्र्यांची घोषणा
मुंबई / प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणार्‍या चाकरमान्यांसाठी खूश खबर आहे. या चाकरमान्यांसाठी एसटीची व्यवस्था करण्यात येणार आहे. काही अटी आणि शर्तींवर ही व्यवस्था करून देण्यात येणार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी सांगितले.
अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून चाकरमान्यांना दिलासा देणारी ही बातमी दिली. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एसटीची सेवा उपलब्ध करून द्यावीच लागणार आहे. अटी शर्ती आणि नियमांचे पालन करूनच ही व्यवस्था करून देण्यात येणार असून, एसटीने कोकणात जाण्यासाठी काय नियम असतील याची माहिती लवकरच देण्यात येईल, असे परब यांनी सांगितले. कोकणात मोठ्या प्रमामावर गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा करोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील विविध भागातील चाकरमानी गणेशोत्सवात कोकणात जातोच त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही आयसीएमआरच्या गाईडलाइन मागवल्या असून या सर्व गोष्टींचा अभ्यास करून चाकरमान्यांसाठी एसटीची सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असे ते म्हणाले.