Breaking News

विधानसभा निवडणुकीवेळी आयोगाकडून भाजपच्या आयटी सेलचा वापर, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप !

विधानसभा निवडणुकीवेळी आयोगाकडून भाजपच्या आयटी सेलचा वापर! पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
मुंबई/प्रतिनिधी
भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियाचे कंत्राट भाजपच्या एका पदाधिकार्‍याला दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. विशेष म्हणजे, तो पदाधिकारी भाजपचा आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता, असा दावाही चव्हाण यांनी केला. याप्रकरणी भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांनी २०१९ सालाच्या निवडणुकीवेळी कुणाच्या दबावाखाली भाजपच्या पदाधिकार्‍याच्या कंपनीला कंत्राट दिले? त्यांच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही राजकीय दबाव होता का? त्यावेळी निवडणूक आयुक्त कोण होते? त्यांना कोणी नेमले होते? या सर्व गोष्टींची सखोल चौकशी व्हायला हवी. भारतीय संविधानानुसार ज्या संस्था उभ्या आहेत त्यांचा गैरवापर भाजपने केला, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. २०१९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी फेसबुकवर निवडणुकीबाबत जनजागृती करण्यासाठी चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र हे पेज सुरु केले होते. या पेजवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक संदर्भात अनेक जाहिराती देण्यात आल्या होत्या. हे पेज तयार करताना वापरकर्त्याने ‘२०२ प्रेसमन हाऊस, विलेपार्ले, मुंबई’ असा पत्ता दिला होता. हा पत्ता कोणाचा आहे याबाबत आम्ही शोध घेतला असता, ही धक्कादायक माहिती समोर आली. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सरकारच्या प्रसिद्धीच्या जाहिरातीचे काम ‘साईनपोस्ट इंडिया’ नावाच्या एका जाहिरात कंपनीस दिले होते. उपरोक्त पत्ता या साईन पोस्ट कंपनीचा आहे. हाच पत्ता ‘सोशल सेंट्रल’ नावाच्या डिजिटल एजन्सीद्वारेदेखील वापरला गेला आहे. ही कंपनी देवांग दवे याच्या नावावर असून तो भाजपच्या यूथ विंगच्या आयटी आणि सोशल मीडियाचा राष्ट्रीय संयोजक आहे.
घटनेच्या कलम ३२४ अनुसार निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निर्देशन आणि नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणुका निष्पक्ष आणि निर्धोक वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. पण या प्रकारावरुन असे निदर्शनास येत आहे की, महाराष्ट्र निवडणूक आयोग आपले कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत आहे. या प्रकरणाची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी विनंती पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना केली आहे.
--
केंद्रीय आयोगाने अहवाल मागविला
निवडणूक आयोगाच्या प्रवक्ता शेफाली शरण यांनी ट्विट करुन, याप्रकरणी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला संपूर्ण माहितीसह अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले आहे. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांच्या एका ट्विटवरील प्रश्नावर उत्तर देताना, ही माहिती दिली. साकेत गोखले यांनीच निवडणूक आयोगावर हे आरोप लावले आहेत. प्रकरणी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला संपूर्ण माहितीसह अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले आहे.
----------------------------