Breaking News

सुनिताताई गडाख ‘पॉझिटीव्ह’; शंकरराव ‘होम क्वारंटाईन’!

मंत्री गडाखांच्या घरी कोरोनाची एण्ट्री!

- जलसंधारणमंत्री शंकरराव गडाखांनी ट्वीटरद्वारे दिली माहिती
- सोनईला कोरोनाचा विळखा, 22 कोरोनाग्रस्तांची नोंद

नेवासा/ संदीप गाडेकर
नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती व राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी सुनिताताई गडाख यांचा कोरोना विषाणू अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे मंत्री शंकरराव गडाख यांनीही आपला घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी दिला असून, स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतःच ट्वीट करून दिली. गडाख यांच्या घरी कोरोनाची एण्ट्री झाल्याने सोनईसह नेवासेकर काळजीत पडलेले आहेत.
मंत्री शंकरराव गडाख यांचे गाव असलेले नेवासे तालुक्यातील सोनई येथे एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाली होती. या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सोनईसह परिसर सील करण्यात आला होता. स्वत: शंकरराव गडाख, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी गावात विशेष पथके तैनात केली होती. आरोग्य विभागाने 11 पथके कार्यरत केले असून, परिसरात तपासणी करण्यात येत आहे. इतर तपासणीच्या निमित्ताने सुनिताताई गडाख यादेखील वारंवार रुग्णालयात गेल्या होत्या. रुग्णालयातील काम आटोपून घरी जाताना खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी चाचणीसाठी स्राव दिला होता. शुक्रवारी (ता.17) रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर शनिवारी मंत्री शंकरराव गडाख यांनीदेखील तातडीने आपला स्राव तपासणीसाठी देवून नगर येथील बंगल्यावर होम कॉरंटाईन झाले आहेत. पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे मंत्री गडाख यांनी ट्विट करुन माहिती दिली. सध्या सोनई गाव हॉटस्पॉट आहे. येथे शनिवारी सकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या बावीस झाली आहे. सुनीताताई गडाख यातून लवकर बाहेर पडो, अशी देवाला प्रार्थना कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. सोशल मीडियावर तशा पोस्ट टाकल्या जात आहेत.

सोनई 14 दिवसांसाठी हॉटस्पॉट जाहीरसोनई गावात एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण गाव सध्या 14 दिवसांसाठी हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहे. गावाकडे येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री शंकरराव गडाख यांनी गावात फिरून उपाययोजनांचा आढावा घेतला होता.