Breaking News

मुंडे, शेलार, तावडे राष्ट्रीय कार्यकारिणीत?

- दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या- फडणवीसांचीही केंद्रीय कार्यकारिणीत लागणार वर्णी


नवी दिल्ली/वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे-पालवे, आशीष शेलार आणि विनोद तावडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत तळ ठोकून असल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले. जे. पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरच्या या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीत सुरू असलेल्या भाजपच्या गोटातील हालचालीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दिल्लीला गेले. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच, फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत निवड होणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच, पंकजा मुंडे, आशीष शेलार, विनोद ताडवे, संभाजी-निलंगेकर पाटील यांनाही राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे जे. पी. नड्डा यांनी 20 जानेवारी रोजी स्वीकारली होती. नव्या अध्यक्षाबरोबरच नवी कार्यकारिणी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, करोना आणि लॉकडाऊन यामुळे ही कार्यकारिणी लांबली होती. मात्र, येत्या 8 ते 10 दिवसात ही नवी कार्यकारिणी अस्तित्वात येण्यार असल्याचेही सूत्र म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे, आशीष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर-पाटील या महाराष्ट्रातील चार नेत्यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच माजी मंत्री हंसराज अहिर यांनाही राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचीही भाजपच्या संसदीय कार्य समितीत नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांना भाजपच्या राज्य कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नव्हते. त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते.