Breaking News

पवारांचीच कबुली, मुख्यमंत्र्यांवर नेते नाराज!

पवारांचीच कबुली, मुख्यमंत्र्यांवर नेते नाराज!

शरद पवारांच्या गुगलीने शिवसेना सावध!

- महाविकास आघाडीत सर्वकाही ऑलवेल नसल्याचे पवारांचे संकेत
- राज्याच्या हितासाठी एकत्र यायला तयार, पण निवडणुका वेगळ्या लढू; शिवसेनेबाबत भाजपचेही सूचक विधान
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात हजर राहण्याचे सूचक निर्देश
मुंबई/खास प्रतिनिधी
शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास राज्याच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार आहे, पण निवडणुका वेगवेगळ्या लढू, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाकडून जाहीर झाली असतानाच, महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे रिमोट माझ्या हातात नाही, पण काही नेते अस्वस्थ आहेत असे सांगत, राजकीय वातावरण पेटवले आहे. पवारांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नेते नाराज असल्याची जाहीर कबुली दिली असल्याने शिवसेनादेखील सावध झाली आहे.
राज्यात सरकार महाविकास आघाडीचे असले तरी स्टेअरिंग माझ्या हातात आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाच्या मुलाखतीत म्हटले होते. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हाती स्टेअरिंग पकडलेला व उद्धव ठाकरे हे बाजूला बसलेला फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या सूचक शुभेच्छा दिल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री उद्धव ठाकरेंच्या कारभारावर नाराज आहेत अशी चर्चा होती. त्यावर शरद पवारांनी एका मुलाखतीत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, तिन्ही पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या एकांगी कारभारामुळे या परिस्थितीत सर्व चाचपडून पाहिल्यानंतर शिवसेनेकडे नेतृत्व द्यावे यावर एकमत झाले, असे त्यांनी सांगितले. तसेच काही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे, महाविकास आघाडीचे सरकार आले तरी कुठल्याही आघाडीच्या सरकारमध्ये नाराजी आणि अस्वस्थता असते. राज्य चालवताना काही इच्छा असतात त्या पूर्ण झाल्या नाहीत तर अस्वस्थता वाढते. सध्या नवीन पर्याय नसल्याने हे सरकार पाच वर्षे चालेल, सध्याची परिस्थिती पाहता कोणालाही निवडणूक नको आहे, असेही पवार यांनी सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याची कबुलीच दिली. तसेच राष्ट्रवादीत अनिल देशमुख, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे यांना फिल्डवरची जबाबदारी दिली आहे. तर अजितदादांची फिल्डपेक्षा मंत्रालयात अधिक गरज आहे कारण त्यांच्याकडे अर्थ नियोजनाची जबाबदारी आहे. जयंत पाटील आणि अजित पवार पक्षाचे कामही पाहत आहेत, असेही पवारांनी सांगितले. दरम्यान, भाजपाला लोकशाही पचत नाही, दुसर्‍या विचारांचे सरकार नको अशी त्यांची भूमिका आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वांना सोबत घेऊन जायचे असते पण त्यांना असे करु देत नाहीत, असे सांगत पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपाच्या इतर नेत्यांना टोला लगावला.
---
भाजपची पुन्हा शिवसेनेला साद
राज्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडत आहे, आगामी काळात जर शिवसेनेकडून प्रस्ताव आला तर राज्याच्या हितासाठी एकत्र यायला तयार आहोत पण निवडणुका वेगळ्या लढू असे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत केले. त्यामुळे राज्यात शिवसेना-भाजपा एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
---------------------