Breaking News

नेवासा गौण खनिज तस्करीची उच्चस्तरीय चौकशी करणार - प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन

नेवासा गौण खनिज तस्करीची उच्चस्तरीय चौकशी करणार - प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन

तहसीलदारांवरील कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवणार : काळे यांचे उपोषण समाप्त
नेवासा/तालुका प्रतिनिधी -
 नेवासा तालुक्यातील गौण खनिज तस्करीची उच्चस्तरीय चौकशी करण्यासह तहसीलदारांची चौकशी करून त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन नगरचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिल्यानंतर 'छावा'चे रावसाहेब काळे यांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण थांबवले आहे.

कोविड-19 तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करून शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना निलंबित करण्याबरोबरच बेसुमार गौण खनिज तस्करीतून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडल्याप्रकरणी त्यांच्या संपूर्ण कारभाराची उच्चस्तरिय सखोल चौकशी होण्याच्या मागणीसाठी छावाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी मंगळवार दि.14 जुलै पासून वांजोळी (ता.नेवासा) येथील राहत्या घरी आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणादरम्यान शोषण डिस्टनसिंगच्या  नियमांचे पालन करत वांजोळी ग्रामस्थांसह छावाचे जिल्हाभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी भेटी देऊन काळे यांना पाठिंबा दिला. मात्र उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही शासकीय स्तरावरून कोणीच फिरकले नसल्याचे निदर्शनास आल्यावर ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी या असंवेदनशीलते विरोधात संताप व्यक्त करत स्वयंस्फूर्तीने गुरुवारी नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरीपुलावर रस्ता रोको आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली. या आक्रमक भूमिकेने प्रशासन पुरते हडबडून जाऊन गुरूवारी सकाळीच आरोग्य विभागाने काळे यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर तहसीलदार सुराणा यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन काळे यांच्याशी चर्चा करून त्यांचे समाधान करण्याचा केलेला प्रयत्नही विफल ठरला. चार वाजता नगरचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी भेट देऊन काळे यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून नेवासा तालुक्यातील गौण खनिज तस्करीची उच्चस्तरीय चौकशी करण्याबरोबरच तहसीलदार सुराणा यांच्या वर्तणूक व कारभाराचीही सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रांताधिकार्यांच्या समर्पक उत्तरामुळे समाधान झाल्याने काळे यांनी छावाचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ वाघ यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले. 

याप्रसंगी नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे, उपाध्यक्ष सुनील भोगे, सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, संदीप मोटे, तसेच वांजोळी सेवा संस्थेचे अध्यक्ष बद्रीनाथ खंडागळे, आदिनाथ काळे, छावाचे गणेश येवले, राम कराळे, दत्ता वामन, बबन वाघुले, सुभाष आल्हाट, शाहीर कान्हू शिंदे, कामगार तलाठी दीक्षे आदी उपस्थित होते.