Breaking News

हजारो लीटर दुधाची नासाडी

- दूध दरवाढीसाठी आंदोलक रस्त्यावर

सांगली / कोल्हापूर/ प्रतिनिधी
राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन थेट रस्त्यावर उतरले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी येथे कालभैरवनाथ मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून दूध आंदोलन करण्यात आले. तर  दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्ह्यातील अकोलेमधील नवलेवाडी येथे दगडाला दुधाचा अभिषेक करुन सरकारचा निषेध करण्यात आला.  सांगलीत महामार्गावर दूध ओतून आंदोलनाला सुरुवात झाली होती.
राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन चांगलेच पेटले. दूध खरेदी दरामध्ये वाढ व्हावी, या मागणीसाठी भाजपनेतर मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. कोल्हापूर, सांगलीत दुधाचे टँकर अडवून हजारो लीटर दूध रस्त्यावर ओतण्यात आले तर काही ठिकाणी दुधाचा अभिषेक करण्यात आला. शेतकर्‍यांना गायीच्या दुधासाठी प्रति लीटर पाच रुपये अनुदान मिळावे, तसेच दूध पावडर निर्यातीला चालना मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पहाटेपासूनच आंदोलन सुरू केले होते. सांगली जिल्ह्यात पुणे-बंगळुरु महामार्गावर येलूर फाटा येथे दुधाचा टँकर अडवून हजारो लीटर दूध रस्त्यावर ओतण्यात आलेतर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दूध संघांची वाहने अडवून दूध रस्त्यावर ओतण्यात आले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री येथील आंदोलनात सहभाग घेऊन गोकुळ दूध संघाचे दुधाचे कॅन रस्त्यावर ओतले. तर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने नवलेवाडी येथे दगडाला दुधाचा अभिषेक करुन सरकारचा निषेध, अशी माहिती संघटनेचे डॉ.अजित नवले यांनी दिली. जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्त्वाखाली एक दिवस दूध संकलन न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचबरोबर येथील अंबड तालुक्यातील वडीगोद्रीत गोरगरीबांना 50 लिटर दूधाचे मोफत वाटप करण्यात आले. अहमदनगरमध्ये सलग दुसर्‍या दिवशी दूध आंदोलन सुरुच होते. याठिकाणी किसान सभा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली होती. नाशिकमध्ये अनेक ठिकाणी दूध आंदोलन झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दिंडोरी चिंचखेडमध्ये सरकारला सुबुद्धी यावी यासाठी महादेवांना दुग्धाभिषेक करण्यात आला. पुण्यात दुधाला भाव मिळावा यासाठी छावा संघटनेचे प्रतिकात्मक आंदोलन सुरू आहे. शेतकर्‍यांचे संकट कमी होऊन दुधाला भाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रतिमा छावा संघटनेकडून दुधात टाकण्यात आल्या होत्या. संतप्त आंदोलनकर्त्यांनी सांगलीत थेट गोकुळ दूध संघाचा दूध टँकर फोडला. यावेळी 25 हजार लिटर दूध रस्त्यावर ओतण्यात आले. तसेच रस्त्यावरील दूध वाहतूकदेखील रोखण्यात आली.