Breaking News

डॉ. बोरगे, मिसाळसह आरोपी फरार कसे?

- अटकपूर्व जामिनासाठी आरोपींची धावाधाव
- तोफखाना पोलिसांचे वर्तन पुन्हा संशयास्पद

अहमदनगर/विशेष प्रतिनिधी
महापालिकेच्या आरोग्य विभागातील नर्स महिलेच्या घरी जावून दारूपार्टी करत तिच्याच अल्पवयीन मुलास सिगारेटचे चटके देऊन अमानुष मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेले महापालिकेचे अधिकारी डॉ. अनिल बोरगे व शंकर मिसाळसह चौघेही सद्या फरार असून, ते अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करत आहेत. विशेष म्हणजे, वादग्रस्त ठरलेल्या तोफखाना पोलिसांनी अल्पवयीन मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याबद्दलचा गुन्हाच दाखल न केल्याची बाबही उघडकीस आली आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक मुलाणी हे संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. फरार आरोपी पोलिसांना सापडत नसल्याबद्दलही आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेचा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे व महापालिकेच्या अग्निशमन दलाचा प्रमुख मिसाळ या दोघांचे वर्तन नेहमीच वादाचे राहिलेले आहे. आरोग्य विभागातील त्या नर्ससोबत त्यांच्या नाजूक संबंधाची चर्चाही नेहमीच होत राहिली आहे. त्या नर्सच्या मुलाने या अधिकार्‍यांच्या घरी होणार्‍या दारुपार्ट्यांना विरोध केल्यामुळे या अधिकार्‍यांनी त्याला सिगारेटचे चटके देत मारहाण केल्याचा आरोप असून, याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाल्यापासून आरोपी आरोग्याधिकारी बोरगे, अग्निशमन विभागाचा प्रमुख मिसाळ, कर्मचारी बाळू घाटविसावे व आरोग्य विभागात नर्स म्हणून काम करणारी त्या अल्पवयीन मुलाची आई फरार झालेले आहेत. तसेच, अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धडपड करत आहेत.

या प्रकारात तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुलाणी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संबंधित मुलाने प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना आपणास गच्चीवरून फेकून देण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले होते. परंतु, पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हाच दाखल केला नाही, ही बाबही उजेडात आली आहे. याबाबत मुलाणी यांचा तर्कही विचित्र पुढे आला असल्याचे एका प्रतिष्ठीत दैनिकाच्या संपादकांनी आपल्या विशेष लेखात नमूद केले आहे. तसेच, याच लेखात पीआय मुलाणी यांच्या कारभाराची लक्तरेही वेशीवर टांगली गेली आहेत. त्यामुळे मुलाणी यांना तातडीने तोफखाना पोलिस ठाण्यातून हलविण्याचा निर्णय पोलिस अधीक्षकांनी घेण्याची गरज आहे. तसेच, त्यांच्या जागी सक्षम पोलिस निरीक्षकाची नेमणूक करण्याचीही गरज आहे. याबाबत पोलिस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे नगरकरांचे लक्ष लागलेले आहे.