Breaking News

आयपीएल-२०२० यूएईमध्ये रंगणार!

आयपीएल-२०२० यूएईमध्ये रंगणार!
- बीसीसीआयकडून तारखांची घोषणा
- १९ सप्टेंबरला वाजणार आयपीएलचा बिगुल
मुंबई/प्रतिनिधी
आयपीएल-२०२० चा १३ वा हंगाम आखाती देशांत (यूएई) खेळवला जाणार आहे. ‘बीसीसीआय’ने १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल-२०२० खेळवण्याचे निश्चित केले. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी तारखांची घोषणा केली, मात्र केंद्र सरकारची मंजुरी प्रलंबित असल्याची माहिती आहे.
आयपीएलचे बिगुल १९ सप्टेंबर म्हणजे आजपासून बरोबर ५७ दिवसांनी वाजणार आहे. आयपीएलमधील सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २ वाजता (यूएईच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता) सुरू होण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे आयपीएलची संपूर्ण टुर्नामेंट रंगणार आहे. क्रिकेटपटूना कमी थकवा, तर ब्रॉडकास्टरना अधिक कमाईसाठी उपयुक्त असतील, ब्रिजेश पटेल म्हणाले. विविध भागधारकांशी सल्लामसलत करुन, आवश्यक त्या सर्व बाबींचा विचार करुन आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्हाला सरकारकडून अधिकृत प्रतिसाद मिळाल्यानंतर औपचारिकरित्या प्रशासकीय समिती बोलविली जाईल. पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला हे होईल, अशी आम्हाला आशा आहे, असे ब्रिजेश पटेल म्हणाले. यंदाच्या आशिया चषकाचे आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दिली होती. क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली टी-२० लीग आयपीएल-२०२० मार्चपासून सुरु होणार होती, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा हा 'सण' दोन महिन्यात भेटीला येत आहे.
--------------------------