Breaking News

बंदी झुगारून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे, कायगाव टोका येथे आंदोलन!

बंदी झुगारून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे, कायगाव टोका येथे आंदोलन!
- पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
- मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक
औरंगाबाद/ विशेष प्रतिनिधी
मराठा आरक्षण व इतरप्रश्नी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने औरंगाबादेत आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेत शहीद होणारे स्व. काकासाहेब शिंदे यांच्या बलिदान दिनानिमित्त कायगाव टोका येथेही आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही बंदी झुगारून आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी हे आंदोलन शांततेत हाताळून काही आंदोलकांची धरपकड केली.
मराठा आंदोलनासाठी बलिदान देणार्‍या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या आणि अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते सकाळी आंदोलनाच्या दिशेने रवाना झाले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना गंगापूर फाटा येथे अडवले आणि काकासाहेब शिंदे समाधीस्थळी जाण्यास मज्जाव केला. हे आंदोलक कायगाव टोका येथे जाणार होते. परंतु पोलिसांनी गंगापूर फाट्यावरच रोखल्याने आंदोलकांनी तिथेच ठिय्या दिला. पोलिसांनी या भागात संचारबंदी लागू केली होती. परिणामी, आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले व नंतर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, काही आंदोलकांनी औरंगाबाद येथेही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलिसांच्या बंदोबस्तामुळे हे आंदोलन होऊ शकले नाही. गनिमी काव्याने आंदोलनाची शक्यता पाहाता, कायगाव टोका येथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, औरंगाबाद - नगर या महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती. नगर व औरंगाबाद जिल्ह्याचे पोलिस सीमेवर तैनात होते.
--------------------