Breaking News

पगारवाढ प्रकरणी श्रीगोंदा बाजार समितीचे सचिव दोषी.

लवकरच कारवाई करणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी दिली.
कोळगाव प्रतिनिधी : योगेश चंदन :

श्रीगोंदा बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांनी संचालक मंडळाच्या अस्थिर व बेबंद  कारभाराचा फायदा घेऊन आपला पगार  जिल्हा उपनिबंधक यांची परवानगी न घेता  संचालक मंडळाच्या ऐनवेळी केलेल्या ठरावात नोंद करून परस्पर पगार वाढवला. सहकार खात्याला अंधारात ठेवून कुठहीही मान्यता घेतली नसल्याने या प्रकाराची तक्रार समितीचे संचालक उमेश पोटे यांनी सहकार विभागाकडे केली होती. तात्काळ जिल्हा निबंधक व सहकार विभागाने सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केला.त्यात बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे हे दोषी असल्याचे निष्पन्न झाले. अहवालात त्यांच्यावर गैरकारभाराचा ठपका ठेवल्याने  त्यांच्यावर काय कारवाई जिल्हा उपनिबंधक करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
                शेतकऱ्याची कामधेनू असलेली श्रीगोंदे तालुका सहकारी कृषी उत्पन्न बाजार समिती नावारूपाला आलेली महत्त्वाची संस्था आहे.संस्थेने श्रीगोंदा, काष्टी ,चिंभळा, घोगरगाव या उपबाजाराच्या शाखा आहेत.जिल्ह्यासह राज्य व बाहेरील राज्यांचेे व्यापारी इथे खरेदीसाठी येत असल्याने कांद्यासह इतर भुसार मालाची आवक-जावक मोठ्या प्रमाणात होत असते. समितीचे स्वतःचे मालकीचे गाळे असल्याने बाजार समितीचे उत्पन्न चांगले आहे.
                  दोन वर्षांपूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीत नागवडे,जगताप, गटाची सत्ता आली. सभापती म्हणून धनसिंग भोईटे यांची निवड झाली.मात्र गटबाजीमूळे अल्पावधीतच त्यांना फक्त नामधारी अध्यक्ष ठेवले. आणि पाचपुते गटाचे उपसभापती वैभव पाचपुते यांच्याकडे सह्यांचे अधिकार आले.पाचपुते यांनी चांगले निर्णय घेत आपल्या कामाची चमक दाखवली. मात्र सचिव डेबरे यांच्या गैरकारभाराची अनेक प्रकरणे चर्चिले जात आहेत.अनेक संचालकांनी  याबाबत आवाज उठविला असून त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी सहकार विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यातच सचिव दिलीप डेबरे यांनी परस्पर वाढविलेल्या पगाराचे प्रकरण समोर आले असून त्यांनी पणन विभाग आणि जिल्हा उपनिबंधक यांच्या परवानगी शिवाय आपल्या पगारात भरभक्कम वाढ केली.तक्रारी दाखल केल्यानंतर सहकार विभागाने कसून चौकशी सुरू केली .चौकशी अहवाल शनिवारी सहाय्यक निबंधक यांनी सादर केला. त्यात पगारवाढ प्रकरणात बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे दोषी असल्याचा ठपका सहाय्यक निबंधक यांनी डेबरे यांच्यावर ठेवला आहे.व याबाबत लवकर कारवाई करणार असल्याचे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी सांगितले.