Breaking News

राज्यात १ ऑगस्ट पासुन दुध उत्पादकांचा एल्गार ! शेतकरी नेते अनिल देठे यांची माहिती !राज्यात १ ऑगस्ट पासुन दुध उत्पादकांचा एल्गार ! शेतकरी नेते अनिल देठे यांची माहिती !
पारनेर / प्रतिनिधी :-
                  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात घटलेली आहे त्यामुळे दुधाचे खरेदी दर प्रतिलीटर ३२ रूपयांवरून १७ ते १८ रूपयांपर्यंत घसरलेले आहेत व या दरात शेतकऱ्यांना दुधाचा उत्पादन खर्च देखील मिळत नसल्याने दुध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.या संदर्भात शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांच्यासह राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांना पञ पाठवून दुधाला प्रतिलीटर ३० रू.दर किंवा प्रतिलिटर १० रू.अनुदान देण्याची तसेच दुधभुकटिला निर्यातीवर ५० रू.प्रति कि.अनुदान  देण्याची मागणी केली होती , त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या वतीने दुग्ध विकास मंत्री ना.सुनिल केदार व राज्यमंञी ना.दत्ताञय भरणे यांनी २१ जुलै रोजी राज्यातील प्रमुख शेतकरी नेत्यांशी ऑनलाईन बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले व लवकरच राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत विस्तृत चर्चा करून दुध उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल अशी योजना आम्ही आणु असे आश्र्वासन दिले.
                  तथापि बैठक होऊन तीन , चार दिवस उलटून गेले तरी राज्य सरकारच्या वतीने काहिच हालचाल होताना दिसत नसल्याने अखेर २५ जुलै रोजी दु. ३.०० वा.राज्यातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक पार पडली या बैठकीत माजी राज्यमंत्री आ.सदाभाऊ खोत , किसान सभेचे नेते डॉ अजित नवले , शेतकरी नेते तथा राज्य सुकाणू समिती सदस्य अनिल देठे पाटील , रोहिदास धुमाळ , धनंजय धोरडे , महेश नवले , सुरेश नवले , डॉ संदिप कडलग , उमेश देशमुख , माउली हळवणकर आदी नेत्यांनी सहभाग घेतला. सदर बैठकीत १ ऑगस्ट पासुन राज्यात दुध उत्पादकांचा दुध बंद एल्गार आंदोलन करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. १ ऑगस्ट रोजी राज्यातील दुध उत्पादक शेतकरी आपलं दुध कुठल्याही दुध संस्थेस , संघास देणार नाहीत.त्या दुधाचा आपापल्या गावातील चावडीवर सामुहीकरित्या स्वयंमशिस्त पाळुन व सामाजिक अंतर ठेवून दुग्धाभिषेक आंदोलन करतील तसेच समाजातील गरजु लोकांना मोफत दुध वाटप देखील करतील.तसेच २ ऑगस्ट रोजी राज्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची पुन्हा ऑनलाईन बैठक होईल.व त्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल.असे शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी पञकारांना माहिती देत असताना सांगितले. व अहमदनगर जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.