Breaking News

सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर आता घरीच उपचार

- केंद्र सरकारची नवी नियमवली जारी

नवी दिल्ली /प्रतिनिधी
देशात सौम्य लक्षण आणि लक्षणे नसलेल्या कोरोनाच रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णालयांवरचा ताण कमी करण्याकरता केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या कोरोनाबाधित रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत किंवा ज्या रुग्णांना लक्षणेच नाही अशा रुग्णांवर आता घरीच विलग करून उपचार होणार आहेत. घरीच उपचार होणार असले तरीही डॉक्टरांची पूर्ण नजर या रुग्णांवर असणार आहे. तसेच, घरीच विलग राहून उपचार घेणार्‍या रुग्णांसाठी केंद्र सरकारने काही नियमावलीही तयार केली आहे.
देशात काल दिवसभरात 22 हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा सव्वा सहा लाखांपेक्षाही वर गेला. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांवरील ताण वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून अतिसौम्य आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हमीपत्रावर स्वाक्षरी करुन रुग्ण घरी राहूनच आपला उपचार सुरू करू शकतो. मात्र, घरात स्वय विलगीकरण आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना वेगळे राहण्याची सुविधा असली पाहिजे. मात्र, एचआयव्ही, रोपणाची शस्त्रक्रिया झालेले, कर्करोगावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना ही सुविधा मिळणार नाही. त्याचप्रमाणे उच्चरक्तदाब, मधुमेह, ह्रदयविकार, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंडाचे आजार असलेल्या रुग्णांना योग्य वैद्यकीय मूल्यमापनानंतरच घरच्या विलगीकरणाची परवानगी मिळेल.