Breaking News

कुळधरणच्या 'त्या' केंद्र चालकाच्या उलट्या बोंबा, म्हणतो पत्रकार विकतोय युरिया !

कुळधरणच्या 'त्या' केंद्र चालकाच्या उलट्या बोंबा, म्हणतो पत्रकार विकतोय युरिया !
कर्जत : प्रतिनिधी :
कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या प्रकारावर काही दिवसांपूर्वी 'लोकमंथन'ने आवाज उठवला. राक्षसवाडी येथील एका शेतकऱ्याने कुळधरण येथील कृषी सेवा केंद्राचा एक चालक युरियाबरोबर इतर खते घेण्याची सक्ती करत असल्याचा प्रकार समोर आणला. त्याची गंभीर दखल कृषी विभागाने घेतली.

त्यानंतरही त्या कृषी सेवा केंद्र चालकाची मुजोरी थांबताना दिसत नाही. त्याने काही शेतकऱ्यांना आता माझ्याकडे युरिया नाही, युरियाची गाडी पत्रकाराच्या घरी गेली आहे, पत्रकार युरिया विकत आहे, असे सांगायला सुरुवात केली आहे. त्याचे पुरावे 'लोकमंथन'च्या हाती आहेत. कित्येक शेतकऱ्यांनी संपर्क करून हा प्रकार निदर्शनास आणून दिलेला आहे.

त्या कृषी सेवा केंद्र चालकाच्या मुजोरीला वैतागलेल्या कित्येक शेतकऱ्यांच्या तक्रारी सध्या येऊ लागल्या आहेत. ग्राहकांना पावत्या न देणे, दुकानात वजन काटा न ठेवता मापात घोळ करणे, मुदत संपलेल्या कीटकनाशकांची विक्री करणे, साठेबाजी करून वाढीव दराने खते विकणे अशा त्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्‍नांना न्याय देण्यासाठी पत्रकारितेचा हा लढा सुरूच राहणार आहे.

'लोकमंथन'चे आवाहन : 

कृषी सेवा केंद्रात चालकाकडून आपली अडवणूक, आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार निदर्शनास आल्यास लोकमंथनला नक्की संपर्क करा. ८८३०५२२२७५ या क्रमांकावर संपर्क करून असून याबाबत माहिती द्यावी असे आवाहन करीत आहोत.