Breaking News

तूर्तास अंतरिम आदेश नाही!

- मराठा आरक्षण : 27 जुलैपासून नियमित सुनावणी- वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती नाही


नवी दिल्ली / प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायपीठाने तूर्तास कोणताही अंतरिम आदेश किंवा वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती दिलेली नाही. आता  मराठा आरक्षणप्रकरणी 27 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे. 27, 28 आणि 29 अशी तीन दिवस ही सुनावणी घेतली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती न दिल्याने हा मराठा समाज आणि राज्य सरकारला तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सने बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. न्यायमूर्ती एल. एन. राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकरीत 13 टक्के आरक्षण आहे. मात्र मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रातील आरक्षणाची टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याने, हे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला तांत्रिक अडचणी आल्याने या सुनावणीत न्यायपीठाने याचिकाकर्त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी  27, 28, 29 जुलैरोजी वेळ राखीव ठेवला आहे.राज्य सरकारने हा खटला लढवण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ज्ञ मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया यांची नियुक्ती यापूर्वी केलेली होती. त्यासोबतच आता ज्येष्ठ विधिज्ज्ञ व काँग्रेस नेते कपिल सिब्बल आणि ज्येष्ठ वकील रफीक दादा यांचीदेखील या खटल्यात नियुक्ती केली आहे.