Breaking News

सोन्याच्या दरात ऐतिहासिक उसळी !

सोन्याच्या दरात ऐतिहासिक उसळी
- ओलांडला ५० हजारांचा टप्पा
नवी दिल्ली / प्रतिनिधी
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात सोन्या-चांदीच्या दराने उच्चांक गाठलेला पाहायला मिळाला. बुधवारी तर सोन्याच्या दराने ऐतिहासिक उसळी घेतली असून, ५० हजारांचा टप्पा पार केला. भारतीय सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठल्याने सर्वांनीच भुवया उंचावल्या आहेत. 
बुधवारी भारतीय सराफ बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रामसाठी ५० हजार २० रुपये झाले तर, चांदीचा दर ६१,२०० रुपये झाले. गेल्या सात-आठ वर्षांमधील चांदीचे हे सर्वाधिक दर असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) चांदीचे दर ५८,००० रुपये होते, थोड्याच वेळात यात वाढ झाली आणि दर ६१,२०० रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचले. तर सुरुवातीला सोन्याचे दर  ४९,९३१ होते तर ते क्षणार्धात ५०,०२० रुपये प्रति १० ग्रामच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले.