Breaking News

पाच नंबर साठवण तलावाचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करा, आमदार आशुतोष काळेंच्या सी.डी.ओ.च्या अधिकाऱ्यांना सूचना !

कोपरगाव प्रतिनिधी  :-
 कोपरगाव शहरातील नागरिकांची तहान भागविण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पाच नंबर साठवण तलावाचा आराखडा व अंदाजपत्रक तातडीने तयार करावे अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी सी.डी.ओ. (मध्यवर्ती संकल्पचित्र संस्था) च्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
           कोपरगाव शहरातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या सहकार्याने पाच नंबर साठवण तलावाचे खोदाई काम सुरु केले. जानेवारी महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये देखील या साठवण तलावाचे खोदाई काम अविरतपणे सुरु होते. प्राथमिक स्वरूपातील खोदाईकाम पूर्ण केल्या नंतर पुढील कामाला चालना मिळावी व तळ्याचे पुढील काम लवकरात लवकर कसे सुरु करता येईल यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सी.डी.ओ.(मध्यवर्ती संकल्पचित्र संस्था) चे अधिकारी यांच्यासमवेत नुकतीच कोपरगाव येथे बैठक घेतली. तत्पूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोपरगाव नगरपरिषद यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत सी.डी.ओ.(मध्यवर्ती संकल्पचित्र संस्था) ला साठवण तलावाचे प्रस्तावित संकल्पचित्र तयार करण्यासाठी मुलभूत माहितीमधून सी.डी.ओ.चे समाधान होत नव्हते. या अडचणी दूर व्हाव्या यासाठी बैठक घेतली. या बैठकीत साठवण तलावाचा आराखडा, असलेल्या अडचणी याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी उपस्थित अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेत आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याबाबत या बैठकीत विस्तृत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठक आटोपल्यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी सी.डी.ओ.) संस्थेच्या अधिकाऱ्यांसमवेत गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करण्यात आलेल्या पाच नंबर साठवण तलावाच्या खोदकामाची पाहणी केली. पाच नंबर साठवण तलावाचा आराखडा व अंदाजपत्रक एक महिन्याच्या आत तयार करू असे सी.डी.ओ.च्या अधिकाऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांना सांगितले. साठवण तलावाच्या पुढील काम सुरु होण्यासाठी आजपर्यंत झालेल्या बैठकीत सकारात्मक मार्ग निघाले असून त्या माध्यमातून साठवण तलावाच्या कामाला गती मिळणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
       यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, सी.डी.ओ. (मध्यवर्ती संकल्पचित्र संस्था) चे अधीक्षक अभियंता मुंदडा, कार्यकारी अभियंता विझे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, अभियंता दिगंबर वाघ, अभियंता ऋतुजा पाटील, कर निरीक्षक ज्ञानेश्वर चाकने, मानवसेवा कन्सल्टिंगचे राजेंद्र सनेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सौ. प्रतिभाताई शिलेदार, हिरामण गंगूले, अजीज शेख, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार आदी उपस्थित होते.
              

कोपरगाव शहरातील नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आमदार आशुतोष काळे यांनी निवडून येताच चुटकीसरशी सोडवून दाखवत तीनच महिन्यात आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. निवडणुकीपूर्वी मोफत काम करण्यास नकार देणाऱ्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीने कोणतेही आढेवेढे न घेता विनाशर्त पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदाई काम पूर्ण करून दिले असून यापुढील कामाला चालना मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे करीत असलेल्या पाठपुराव्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.